जिल्हा परिषद शाळेत उदमांजराने दिला पाच पिलांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:49 AM2018-07-14T06:49:25+5:302018-07-14T06:49:38+5:30
शिरूर कासार तालुक्यातील केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारी पाच पिलांसह उदमांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पिलांसह या उदमांजराला सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले असून तिथेच त्यांची काळजी घेतली जात आहे.
बीड - शिरूर कासार तालुक्यातील केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारी पाच पिलांसह उदमांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पिलांसह या उदमांजराला सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले असून तिथेच त्यांची काळजी घेतली जात आहे. वन्यजीवांच्या अधिवासावर माणसांनी अतिकृमण केल्याने आणखी काय काय पाायला मिळणार आहे, असा सवाल वन्यजीवप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजता केतुरा येथील जि.प. माध्यमिक शाळेच्या संगणक कक्षाच्या माळ्यावर उदमांजर आणि तिची पाच पिले असल्याची माहिती येथील अरुण रहाडे व शाळेचे मुख्याध्यापक संतोष पडुळे यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सँक्च्युअरी असोसिएशनचे अध्यक्ष, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून कळवली. विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोनवणे व वन कर्मचारी शिवाजी आघाव घटनास्थळी दाखल झाले.
उदमांजर व नवजात पिले पाहिल्यानंतर, या सर्वांना १५-२० दिवसांसाठी येथेच राहू द्या. ते काहीही करीत नाही. ते दिवसभर झोपून रहतात व रात्री भक्ष्याच्या शोधत बाहेर पडतात, असा विश्वास सिद्धार्थ सोनवणे यांनी शिक्षकांना दिला, मात्र त्यानंतरही विद्यार्थी भितात, उदमांजरास तुम्ही घेऊन जा, अशी विनंती शिक्षकांनी केली. त्यामुळे सोनवणे यांनी उदमांजराला पिलांसह विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात संगोपनासाठी आणले. या उदमांजर व पिलांची देखभाल सृष्टी सोनवणे या करीत आहेत. या पिल्लांनी अजून डोळे उघडलेले नाहीत.
उदमांजरांचा अधिवास संकटात
उदमांजराचा अधिवास हा जुनाट मोठ्या जिवंत व मृत झाडाच्या फांदीवर, झाडाच्या ढोलीमध्ये किंवा डोंगर खडकाच्या, विहिरीच्या कपारीत असतो. याच ढोलीत, तसेच कपारीमध्ये उदमांजरे आपल्या पिलांना जन्म देत असतात. जुनी व मोठमोठी झाडे तोडल्याने, डोंगर कपारीचे उत्त्खनन केल्याने आणि विहिरींना सिमेंट कठडे केल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे हे प्राणी मानवस्तीच्या आश्रयाला येतात व त्यातून असे प्रकार घडत असल्याचे वन्यजीव अभ्यास सिद्धार्थ सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.