उसतोड मजूर, मुकादमांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:46 PM2019-10-13T23:46:17+5:302019-10-13T23:47:35+5:30
ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
मांजरसुंबा : ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. बालाघाटावरील मांजरसुंबा येथे मुकादम आणि ऊसतोड कामगारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत कोयता उंचावून उसतोड कामगारांनी धनुष्यबाणाला साथ देण्याचा निर्णय घेतला. यावेळी ऊस तोडणी कामगार महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, श्रीमंत जायभाये, गोरख रसाळ, राणा डोईफोडे आदी उपस्थित होते.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा आशिर्वाद असल्याशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास आहे. सोशल मिडियावर अफवा पसरविण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. त्यांना काय करायचे ते करू द्या, आपण आपली दिशा ठरवून काम करूया. २४ तारखेला त्यांचा सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम होईल हे नक्की. मुकादम संघटना आणि ऊसतोड कामगार माझ्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळेल यात दुमत नाही. धनुष्यबाणाला मतदान करून मला पाठबळ द्या असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
लालासाहेब घुगे यांनी ऊसतोड मुकादम संघटनेला भविष्यात मदत व्हावी, त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यासाठी जयदत्त क्षीरसागरांचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तर माजी आ. केशवराव आंधळे म्हणाले, ऊसतोड कामगार आणि मुकादमांची बैठक होत असते. या बैठकीत निर्णय ठरतो आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही उमेदवार निवडत असतो. आता आमचे ठरले आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हेच आपले उमेदवार आहेत. त्यांना निवडून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ते म्हणाले. यावेळी दत्तोबा भांगे, नितीन धांडे, रतन गुजर आदी उपस्थित होते.
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज
ऊसतोड कामगार आणि संघटनेच्या भविष्यात अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका ठेऊ. पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तो सुटणे काळाची गरज आहे. त्यासाठी मोठे प्रकल्प होणे आवश्यक आहेत. म्हणूनच केंद्रात आणि राज्यात जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे, अशी भूमिका मांडत जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघात भविष्यामध्ये कराव्या लागणाऱ्या विकासकामांची माहिती दिली.