बीड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे निलंबीत; परभणीत पदभार घेण्याआधीच कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:08 PM2022-06-01T19:08:18+5:302022-06-01T19:08:59+5:30
बीड शहरातील विविध प्रश्नांसह भ्रष्टाचाराच्या तक्रारी डॉ.गुट्टे यांच्याविरोधात विधीमंडळात आमदारांकडून झाल्या होत्या.
बीड : येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांची दोन दिवसांपूर्वीच परभणी येथे उपायुक्त म्हणून बदली झाली होती. तिकडचा पदभार घेण्याआधीच त्यांचे निलंबण करण्यात आले आहे. विधीमंडळाच्या कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून नगर विकास विभागाच्या अवर सचिवांकडून हे आदेश काढण्यात आले आहेत.
बीड शहरातील विविध प्रश्नांसह भ्रष्टाचाराच्या तक्रारी डॉ.गुट्टे यांच्याविरोधात विधीमंडळात आमदारांकडून झाल्या होत्या. त्यानंतर नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चार अधिकाऱ्यांचे निलंबण आणि प्रशासन अधिकारी आणि मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट सांगितले होते. डॉ.गुट्टे हे मंत्री तनपुरे यांची परवागनी घेऊन गेल्याचेही विधीमंडळात घोषित केले होते. परंतू त्यांनी इतर अधिकाऱ्यांना चर्चेसाठी थांबून माहिती देण्याच्या सुचना न दिल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. हा आपल्यावर अन्याय असून आपण याविरोधात न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया डॉ.गुट्टे यांनी लोकमतला दिली.