८२ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:00 AM2019-10-06T00:00:40+5:302019-10-06T00:01:06+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ११ पंचायत समिती कार्यालयांची एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ...
बीड : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ११ पंचायत समिती कार्यालयांची एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आल्या होत्या. तर काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर होते. काही ठिकाणी कर्मचारी कार्यालयात उशिरा हजर झाले. अशा एकूण ८२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने बेशिस्तांना चाप बसला आहे.
२४ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्रदीप काकडे, डी. बी. गिरी आणि चंद्रशेखर केकान यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पंचायत समित्यांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत परळी पंचायत समिती कार्यालयात १३ कर्मचारी गैरहजर आढळून आले. तसेच परळी येथील पाणीपुरवठा उपविभागात २ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले होते.
परळी पंचायत समितीमध्ये ९, केजमध्ये ९, वडवणी पंचायत समितीमध्ये ३७ तसेच पाटोदा पंचायत समितीमध्ये १३ कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या नंतर उशिरा आल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले. या सर्व गैरहजर आणि उशिरा आलेल्या ८२ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या तपासणीत दिसून आलेल्या त्रुटी, अनियमितता व कार्यालयीन कामकाजाबाबत गटविकास अधिकाºयांना कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
बेशिस्तीला लगाम बसणार
एकाच दिवशी अचानक तपासणी करुन दांडीबहाद्दर आणि कामचुकार कर्मचाºयांना जि.प. प्रशासनाने धक्का दिला. पूर्वसूचना न देता गैरहजर राहणे, कार्यालयीन अभिलेखे अव्यवस्थित ठेवणे, कार्यालयाच्या वेळा न पाळणे अशा विविध बाबी या तपासणीत आढळून आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.