रिक्त पदांमुळे ‘एआरटीओ’ची कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:53 PM2020-03-16T23:53:03+5:302020-03-16T23:53:31+5:30
येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे खोळंबली आहेत. ४६ पैकी केवळ १८ कर्मचारी कार्यरत असून २८ रिक्त आहेत.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे खोळंबली आहेत. ४६ पैकी केवळ १८ कर्मचारी कार्यरत असून २८ रिक्त आहेत. यामध्ये उपप्रादेशिक, सहायक परिवहन अधिकाऱ्यांसह वाहन निरीक्षक, सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. महत्त्वाचीच पदे रिक्त असल्याने सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आहे त्या अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढत आहे.
बीडच्या एआरटीओ कार्यालयात शिपाई ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची ४६ पदे आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून अधिकारी, कर्मचाºयांची वाणवा कायम आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक, सहायक वाहन निरीक्षक अशा अधिकाºयांची मुख्य पदेच रिक्त असल्याने वाहन नोंदणी, वाहन विकल्यानंतरची प्रक्रिया, वाहन चालविण्याचा परवाना, वाहन तपासणी आदी कामे खोळंबत आहेत. नागरिकांना एका कामासाठी चार चार वेळेस खेटे मारावे लागत आहेत. त्यातच उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने ११ जुलै २०१९ पासून बीडचा पदभार औरंगाबादचे संजय मेत्रेवार यांच्याकडे सोपविण्यात आला. आठवड्यातून दोन ते तीन वेळाच त्यांचा बीड दौरा होत असल्यानेही अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पदे भरावीत, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
सहायक निरीक्षक मिळाले, पण प्रशिक्षणार्थीच
बीडच्या कार्यालयात सहायक वाहन निरीक्षकांची २० पदे मंजूर आहेत. पैकी ९ लोक कार्यरत असून ११ रिक्त आहेत. परंतु जे नऊ लोक आहेत, ते सर्व प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांचा कामकाजात फारसा उपयोग होत नाही. किमान दोन वर्षे त्यांचा हा कालावधी असतो. त्यानंतरच ते नियमित कामास उपयोगी येतील, असेही मेत्रेवार यांनी सांगितले. हे सर्व लोक चार महिन्यांपूर्वीच रूजू झाले आहेत. वाहन तपासणीस, लेखापाल ग्रामीण, वरिष्ठ लिपीक, हवालदार, वाहन चालक, शिपाई, पहारेकरी यांची पदेही रिक्त आहेत.
अपु-या मनुष्यबळामुळे कामे करताना अडचणी येत असल्या तरी त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. सामान्यांची कामे खोळंबू नयेत, तात्काळ व्हावीत, यासाठी वारंवार सुचना केल्या जातात. वाहन निरीक्षक कमी असल्याने औरंगाबादहून दोघे बोलावले जातात. आणखी सुधारणा करण्यात येईल. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांडे वारंवार पाठपुरावा केला जातो.
- संजय मेत्रेवार,
प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड