रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग पडला ‘आजारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 11:55 PM2019-12-01T23:55:54+5:302019-12-01T23:56:24+5:30
सोमनाथ खताळ। लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ते ४ पर्यंतची ...
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ते ४ पर्यंतची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या यंत्रणेवर कामाचा ताण वाढत आहे. यंत्रणा चालविणारे अधीक्षकासह इतर वर्ग १ ची ४४ पैकी केवळ १० च पदे भरलेली आहेत. त्यामुळे आहे त्या यंत्रणेवर उपचार करताना ताण वाढत आहे. या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणाचा ‘आजारी’ पडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या अधिकारात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये आणि नेकनूरचे स्त्री रुग्णालय येते. या संस्थांमध्ये सामान्य नागरिक आल्यावर त्याच्यावर उपचार करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात वर्ग १ च्या ४४ जागा आहेत. जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक अशी २० पैकी केवळ पाचच पदे भरलेली आहेत. तसेच ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयातही २४ पैकी केवळ पाच पदे भरलेली आहेत. चिंचवण, माजलगाव, नांदूरघाट, नेकनूर, परळी येथेच वर्ग १ ची पदे भरलेली आहेत. इतर १९ पदे रिक्त आहेत.
ही सर्व पदे यंत्रण चालविणारे आहेत. मात्र, हेच रिक्त असल्याने इतरांकडे पदभार देऊन कारभार चालविला जात आहे. जवळपास आरोग्य संस्थांमध्ये प्रभारीच कारभारी बनल्याचे दिसून येत आहे.
वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांवर ताण
वर्ग ३ मध्ये परिसेविका, परिचारीका, आधिसेविका, पाठ्य निर्देशक, वरिष्ठ लिपीक अशी विविध ४१ प्रकारचे पदे आहेत. जिल्ह्यात ४४२ पैकी तब्बल १४१ पदे आजही रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची १४५ पैकी १२५ पदे भरलेली आहेत. वर्ग ४ ची ४१३ पैकी १०९ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
३ नव्हे तर २० रूग्णांमागे १ परिचारिका
जिल्हा रुग्णालय हे ३२० खाटांचे आहे. मात्र, येथील दाखल होणाºया रुग्णांची संख्या दुप्पट असते. नियमानुसार ३ रुग्णांमागे एक परिचारिका असावी. मात्र, रुग्णालयात २० पेक्षा जास्त रुग्णांची सेवा एका परिचारीकेला करावी लागत आहे. त्यामुळे चिडचिड, वाद असे प्रकार होत आहेत.