वाहली आरोग्य केंद्रात ३ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:50+5:302021-05-09T04:34:50+5:30
कुसळंब : पाटोदा तालुक्यातील वाहली प्राथमिक आरोग्य केंद्रात १० मार्चपासून आजपर्यंत तीन हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस ...
कुसळंब : पाटोदा तालुक्यातील वाहली प्राथमिक आरोग्य केंद्रात १० मार्चपासून आजपर्यंत तीन हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. चैताली भोंडवे यांनी दिली. वाहली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० गावे येत असून, प्रत्येक गावातील व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य सहायक सचिन सानपसह त्यांची पूर्ण टीम मेहनत घेत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांत दहा मार्चपासून ११ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ३६ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस, ८९ फ्रन्टलाइन वर्कर यांना पहिला डोस तर ६५ फ्रंटलाइन वर्कर यांना दुसरा डोस देण्यात आला. तर ४५ ते ५९ वयोगटातील ५७३ नागरिकांना पहिला डोस
व ८२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. ६० पेक्षा जास्त वय असलेल्या १५४९ ज्येष्ठांना पहिला डोस तर ५८५ ज्येष्ठांना दुसरा डोस अशा प्रकारे २९९० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. डॉ. चैताली भोंडवे, डॉ. मोहितकुमार कागदे, आरोग्य सहायक सचिन सानप, व्ही. ए. शेवाळे, एस.बी. बोंद्रे, एस. सोनवणे, मोरे, गर्जे, पवार, नागरगोजे, श्रीमती लोहार, श्रीमती ओव्हाळ, काळे, मिसाळ यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.
वय बसत नसले तरी लस देण्यासाठी घाट
या ठिकाणी विविध कामांवरचे महिला व पुरुष कर्मचारी लस घेण्यासाठी आले होते; परंतु अनेक कर्मचाऱ्यांचे वय ३० पेक्षा कमी होते, तरीही येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून दबाव टाकून लस घेण्यासाठी प्रयत्न केला जात होता.
१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी स्वतःची ऑनलाइन नोंदणी करून कोरोना लस घ्यावी. ग्रामीण रुग्णालय पाटोदा या ठिकाणी ७ मे पासून लसीकरण चालू केले असून, याच ठिकाणी नोंदणी करून घेतलेल्या लाभार्थ्यास लस घेता येणार आहे. तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मिळणार नाही. - डॉ. चैताली भोंडवे, वैद्यकीय अधिकारी, वाहली प्राथमिक आरोग्य केंद्र.