६३९४ पथकांमार्फत गोवर, रुबेलाचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:35 PM2018-11-26T23:35:28+5:302018-11-26T23:35:52+5:30
गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात ६३९४ पथके नेमण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बालमृत्यू आणि गर्भवती मातांचा मृत्यू रोखण्यासाठी राज्यभरात सुरु असलेल्या गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात ६३९४ पथके नेमण्यात आली आहेत. २७ नोव्हेंबरपासून जिल्हाभरात महिनाभर लसीकरण करण्यात येणार आहे.
९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ७ लाख ३० हजार २४० लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी ५३५ लस टोचक नियुक्त केले असून, २२७ पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील ३९६५ शाळांमधून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३००४ अंगणवाड्यातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. २८९० अंगणवाडी कार्यकर्ती, १९१९ आशा कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
लसीकरणापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ५७ जोखीमग्रस्त भाग शोधण्यात आले आहेत. येथील लाभार्थ्यांचे जवळच्या रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करणार आहेत.
गोवर - रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, बाल रोग तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था एकत्रित प्रयत्न करीत आहेत.
गोवर : हा विषाणूद्वारे पसरणारा प्राणघातक आजार आहे. गोवरमुळे बालकांना गुंतागुंत होऊन त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. गोवर संसर्गजन्य रोग असून, संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे, शिंकणे याद्वारे पसरतो. चेहऱ्यावर आणि अंगावर उठलेले गुलाबी लालसर पुरळ, ताप, खोकला, वाहणारे नाक, लालसर झालेले डोळे ही गोवरची लक्षणे आहेत. ५ वर्षांच्या खालील आणि २० वर्षांच्या पुढील प्रौढांसाठी गोवर हा रोग प्राणघातक असू शकतो. कारण या रोगामुळे उद्भवणाºया अतिसार, न्योमोनिया आणि मेंदूसंसर्ग यासारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ ाकतो.
रुबेला : सामान्यत: बालकामध्ये हा रोग सौम्य स्वरुपात असतो. पुरळ, हलका ताप, मळमळणे, सौम्य स्वरुपाचा नेत्रदाह ही रुबेलाची लक्षणे आहेत. कानाच्या मागील आणि मानेतील सुजलेल्या लसिका ग्रंथी हे या रोगाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय लक्षण आहे. संसर्ग झालेली प्रौढ व्यक्ती, विशेषत: महिलांना संधीवात, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. या विषाणूचा संसर्ग मुलगा अथवा मुली दोघांनाही होऊ शकतो.