अकरा सरकारी रुग्णालयांत फ्री आणि सात खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांत लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:14+5:302021-03-01T04:39:14+5:30
बीड : जिल्ह्यात आज, सोमवारपासून ६० वर्षांपुढील सर्वच व ४५ वर्षांपुढील आजार असलेल्या लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे. ...
बीड : जिल्ह्यात आज, सोमवारपासून ६० वर्षांपुढील सर्वच व ४५ वर्षांपुढील आजार असलेल्या लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत असेल, तर खासगी केंद्रांवर २५० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. बीडच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरावरून योग्य त्या सूचना करण्यात आल्या असून, याबाबत नियोजनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर्स आणि नंतर फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात आली. आता केंद्र शासनाच्या सूचनांनुसार १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४५ वर्षे वय परंतु व्याधी असलेल्या लोकांना ही लस देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात सरकारी ११ केंद्रांबरोबरच खासगी रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील २० खासगी रुग्णालयांची नावे जाहीर केली असली तरी रविवारी सायंकाळपर्यंत सातच रुग्णालयांची नावे आरोग्य विभागाकडे आली होती. त्यांनी पैसे भरून लसीचे १०० डोस नेल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या लसीकरणाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरणाबाबत योग्य त्या सूचना केल्या. बीडमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम, डॉ. एल. आर. तांदळे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी हे सर्व अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सला जॉईन होते.
कोट
जिल्ह्यात सरकारी ११ संस्था आणि खासगी सात रुग्णालयांत कोरोना लस दिली जाणार आहे. २० लोकांची यादी असली तरी सात लोकांनीच पैसे भरले आहेत. त्यांना १०० डोस दिले आहेत. खासगी रुग्णालयांना लसीकरण देण्याबाबतचे प्रशिक्षण वरिष्ठ स्तरावरून देण्याचे काम सुरू आहे. आमच्याकडून दिले नाही.
डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड
येथे मिळणार कोरोना लस
सरकारी रुग्णालये
१) जिल्हा रुग्णालय, बीड
२) स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई
३) उपजिल्हा रुग्णालय, गेवराई
४) उपजिल्हा रुग्णालय, केज
५) उपजिल्हा रुग्णालय, परळी
६) ग्रामीण रुग्णालय, पाटोदा
७) ग्रामीण रुग्णालय, धारूर
८) ग्रामीण रुग्णालय, आष्टी
९) प्रा. आरोग्य केंद्र, वडवणी
१०) प्रा. आरोग्य केंद्र, शिरूर कासार
११) ग्रामीण रुग्णालय, माजलगाव
खासगी रुग्णालये
१) श्रेया हॉस्पिटल, केज
२) यशवंतराव जाधव हॉस्पिटल, बीड
३) पॅराडाईज हॉस्पिटल, बीड
४) घोळवे हॉस्पिटल, बीड
५) योगिता नर्सिंग होम, केज
६) कराड हॉस्पिटल, परळी
७) स्पंदन हॉस्पिटल, बीड
--
नोंदणी कशी करणार?
लाभार्थ्याने को-विन ॲप २.० डाऊनलोड करावे. येथूनही नोंदणी करता येऊ शकते. यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ही कागदपत्रे आवश्यक असतील. लाभार्थी कोणत्याही राज्यातील असला तरी त्याने पत्ता, वय आणि इतर डाटा योग्य पद्धतीने अपलोड करणे अपेक्षित आहे. को-विन ॲपवर माहिती भरल्यावर लसीकरण केंद्र आणि वेळ आपण ठरवू शकतो. त्यानंतर दिलेल्या वेळेत लस घेता येणार आहे.
कोणाला मिळणार लस
साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले किंवा ४५ पेक्षा जास्त वय असलेले आणि गंभीर आजार असलेल्यांना ही लस दिली जाणार आहे. यात हृदयविकार, मधुमेह, हायपरटेंशन, हेमोडायलेसिस, सीएपीडी, १० वर्षांहून अधिक कमी काळापासून, परंतु गुंतागुंतीचा मधुमेह असलेले आणि हायपरटेन्शनवर उपचार घेणारे लोक ही लस घेण्यास पात्र ठरणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील ४० टक्के लाभार्थी बाकी
जिल्ह्यात सर्वांत आगोदर हेल्थ केअर वर्कर्स आणि त्यानंतर फ्रंट लाईन वर्कर्सला कोरोना लस देण्यात आली. जिल्ह्यात जवळपास २५ हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली असली तरी अद्यापही १०० टक्के लसीकरण पूर्ण झालेली नाही. ४० टक्केच्या जवळपास लसीकरण होणे बाकी असून, आरोग्य विभागाकडून आवाहन केले जात आहे.
===Photopath===
280221\282_bed_24_28022021_14.jpeg
===Caption===
आरोग्य संचालिका डाॅ.अर्चना पाटील यांनी व्हीसीद्वारे बीडच्या अधिकाऱ्यांना लसीकरणाबाबतच्या सुचना केल्या. यावेळी डाॅ.एल.आर.तांदळे.