माणसांचे लसीकरण थांबले अन् जनावरांचे लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:51+5:302021-05-18T04:34:51+5:30
बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मान्सून काही दिवसांत जिल्ह्यात धडकणार आहे. या काळात ...
बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मान्सून काही दिवसांत जिल्ह्यात धडकणार आहे. या काळात केले जाणारे जनावरांचे लसीकरण लटकल्याचे चिन्ह असून लसीची मागणी करण्यात आली असून, या महिन्याच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात जवळपास साडेबारा लाख पशुधन आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, बैल आदींचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करणे गरजेचे असून, ते केले नाही तर टीपीआर, एफएमडी, घटसर्फ, फऱ्या, लाळ्याखुरकुत, अंत्रविषार आदी रोगांचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच यातील काही रोग हे संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे लसीकरण करणे गरजेचे असून कोरोनामुळे लस प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.
कोरोना महामारीमुळे प्रवासबंदी व लॉकडाऊन आहे. त्यामुळे जनावर आजारी असले तरीदेखील त्याला दवाखान्यात घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गावासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांना गावागावांत आठवड्यातून एकदा भेट देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. तर, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालून गावागावांत फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. तसेच लसीकरण देखील लवकरात लवकर करावे, जेणेकरून कोणत्याही आजाराची लागण पशुधनास होणार नाही.
जिल्ह्यातील पशुधनाची एकूण आकडेवारी
गाय ५८२०८०
म्हैस २४०२८४
मेंढ्या ६६२११
शेळ्या ३३६२२३
गाढवे १५४८
घोडे ६१०
जनावरांना दिल्या जातात या लसी
वेगवेगळ्या ऋतूमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षा घेऊन लसीकरण मोहीम राबवली जाते.
एफएमडी, टीपीआर, घटसर्प, फऱ्या, लाळ्याखुरकुत, अंत्रविषार आदी लसीकरण केले जाते. मात्र, कोरोनाच्या संसर्ग वाढल्यामुळे पशुधनाच्या लसीकरणास मात्र अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या लसीचे नियोजन मात्र पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेले आहे.
लसी मागविल्या आहेत, मोहीम लवकरच सुरू होईल
मान्सूनपुर्व लसीकरण करण्यासाठी लसीची मागणी केली आहे. पुण्यावरून लसी प्राप्त होतात. कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. लवकरच लस प्राप्त होऊन मोहीम सुरू होईल. तसेच गावागावांत लसीकरण केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहून आल्या गावासाठी असलेल्या दवाखान्यातून लसीची मागणी करावी
रवी सूर्यवाड, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त
प्रतिक्रिया
पशुवैद्यकीय सेवा सुधारण्याची गरज
चौसाळा पशुवैद्यकीय रुग्णालयाअंतर्गत आमचे गाव येते. मात्र, याठिकाणी अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. तसेच येथे असेलले डॉक्टर व कर्मचारी कधीही गावात येत नाहीत. त्यामुळे लसीकरण मोहीम गावात झाली पाहिजे अशी इच्छा आहे.
सतीष जगताप
कोरोनामुळे पशुधनाच्या लसीकरणासाठी विलंब होत असेल. तरी देखील नेकनूर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून होणारे काम चांगले आहे. येथील डॉक्टर गरज पडेत त्याठिकाणी येऊन नि:शुल्क सेवा देतात. लस प्राप्त झाल्यावर त्याचा लाभ देखील दरवर्षी मिळतो.
शाहू खोसे