साठा संपल्याने परळीत लसीकरण थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:29+5:302021-04-24T04:34:29+5:30
परळी : आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण चालू असताना शहर व ग्रामीण भागात शुक्रवारपासून हे ...
परळी : आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण चालू असताना शहर व ग्रामीण भागात शुक्रवारपासून हे लसीकरण बंद पडले आहे. त्यामुळे शुक्रवारी केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. लसीविनाच त्यांना परतावे लागले. लससाठा संपल्याने लसीकरण शुक्रवारी झाले नाही. तर दोन दिवसांत लससाठा येईल, अशी माहिती तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
शुक्रवारपर्यंत परळी तालुक्यात २३ हजार ७६९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. लसीकरणाचे ११४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. शुक्रवारी लस घेण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय व नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या नागरिकांना लस न घेता परतावे लागले. परळी जिल्हा निर्मिती समितीचे अध्यक्ष ॲड. अतुल तांदळे म्हणाले, आपण स्वतः शुक्रवारी दुपारी ३ वाजता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे गेलो असता तेथे कुणीही नव्हते, लससाठाही नव्हता. त्यानंतर आम्ही काही जण खंडोबा मंदिर येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गेलो असता तेथील केंद्रही बंद आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लससाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही ॲड. तांदळे यांनी केली आहे. तसेच परळी तालुक्यातील शिरसाळा, धर्मापुरी, पोहनेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही लस उपलब्ध नव्हती. लससाठा संपल्याने परळी येथील लसीकरण शुक्रवारी बंद होते, अशी तक्रार करून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील माकपचे कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांनी केले आहे. तर, नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर म्हणाले.
परळी येथील उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांवर आतापर्यंत २३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. - डॉ. लक्ष्मण मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, परळी वैजनाथ
दुसरा डोस घेता आला नाही
शहरातील खाजगी रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लससाठा शिल्लक नाही, त्यामुळे दुसरा डोस घेता आला नाही. - आत्माराम कराड, परळी वैजनाथ