लसीकरण स्थळ बदलले; बीडमध्ये आजपासून चंपावती शाळेत व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:27+5:302021-05-07T04:35:27+5:30
बीड : आतापर्यंत कोरोना लसीकरणाची व्यवस्था जिल्हा रुग्णालयात होती. परंतु शुक्रवारपासून हे स्थळ बदलले असून नगर रोडवरील चंपावती प्राथमिक ...
बीड : आतापर्यंत कोरोना लसीकरणाची व्यवस्था जिल्हा रुग्णालयात होती. परंतु शुक्रवारपासून हे स्थळ बदलले असून नगर रोडवरील चंपावती प्राथमिक शाळेत लसीकरण केले जाणार आहे. याचे नियोजन झाले असून गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची जागा खूपच अपुरी आहे. त्यामुळे गर्दी होत होती. शिवाय निरीक्षण कक्ष व प्रतीक्षा कक्षालाही जागा अपुरी पडत होती. अनेकदा भांडणेही झाली होती. हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता जिल्हा रुग्णालयात लसीकरण न करता चंपावती शाळेत करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी लसीकरणस्थळाची पाहणी केली आहे. तसेच नोडल ऑफिसर डॉ. बाबासाहेब ढाकणे यांनी लसीकरण स्थळाची पूर्ण पाहणी करून नियोजनही केले आहे. आता शुक्रवारपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात न येता चंपावती शाळेत यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
वेळ घेतली असेल तरच मिळेल लस
१८ ते ४४ वयोगटातील रोज केवळ २०० लोकांनाच डाेस दिले जाणार आहेत. ज्यांनी ऑनलाईन वेळ घेतली आहे, त्यांनाच ही लस मिळणार आहे. तासनतास रांगेत उभा राहून आणि वेळ घालविला तरी लस मिळणार नाही. कारण नोंदणीच होत नसल्याने त्यांना लस देणे शक्य नसल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. त्यामुळे रिकामी गर्दी करू नये. तसेच आपला वेळही खर्च करू नये. वेळ घेऊनच लसीकरणाला यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
....
आता शुक्रवारपासून चंपावती प्राथमिक शाळेत लसीकरणाची व्यवस्था केली आहे. येथे वेगवेगळ्या वयोगटासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
-डॉ. बाबासाहेब ढाकणे, नोडल ऑफिसर, जिल्हा रुग्णालय, बीड.