४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी रेवकी आरोग्य उपकेंद्रात लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:00+5:302021-04-01T04:34:00+5:30
कोरोना या संसर्गजन्य रोगाने जवळपास एक वर्षापासून थैमान घातले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली ...
कोरोना या संसर्गजन्य रोगाने जवळपास एक वर्षापासून थैमान घातले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू आहे. दरम्यान, बुधवारपासून तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातील सात आरोग्य उपकेंद्रांत कोरोना लसीकरणास आरोग्य प्रशासनाने परवानगी दिली. यानंतर बुधवारी सकाळी तालुक्यातील रेवकी येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ येथील सरपंच संभाजी चोरमले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी समुदा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना शेळके, आरोग्य सेविका अंजली मस्के, गटप्रवर्तक रोहिणी डोंगरे, आरोग्यसेवक राहुल जवळकर, आशा स्वयंसेविका संगीता महानोर, ज्योती मुळे, सीता खेडकर, रेखाताई कावळे, आशा मदने, मीरा जाधव, मदतनीस सुनीता पटेकर यांची उपस्थिती होती. यानंतर गावातील ८० वर्षीय वयोवृद्ध आजी फुलाबाई देवकते यांना पहिली कोरोना लस देऊन लसीकरणास सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास ६३ जणांना कोरोना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना शेळके यांनी दिली.
रेवकी आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. तरी ४५ वर्षांपुढील नागरिकांनी कुठलीही मनात भीती न बाळगता कोरोना लस घ्यावी तसेच लस घेतल्यानंतरही गाफील न राहता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन येथील आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना शेळके यांनी यावेळी केले.