वडवणी तालुक्यात दोन दिवसांपासून लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:08+5:302021-04-26T04:30:08+5:30
वडवणी : कोरोनापासून बचावासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी सुरुवात केली असलीतरी दोन ...
वडवणी : कोरोनापासून बचावासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी सुरुवात केली असलीतरी दोन दिवसांपासून लसीकरणच बंद आहे. सध्या लस साठा संपल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत तालुक्यातील ५ हजार ३३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन पंचेचाळीस वर्षेवरील नागरिकांना मोफत लस उपलब्ध झाली. प्रशासनाकडून लसीकरणचा वेग वाढविण्यात आला. त्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळासाहेब तांदळे डाॅ. अरुण मोराळे, डाॅ. धनंजय ठोकरे, डाॅ. सुजित भोसलेसह आरोग्य कर्मचारी, सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकांनी परिश्रम घेतले.
तालुक्यातील चिंचवण ग्रामीण रुग्णालयात २७०, वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार ४५७ तर कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात १ हजार ६०८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळला. मात्र मागील काही दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिकांची केंद्रावर गर्दी दिसून आली. यातच शुक्रवारी लस संपल्याने दोन दिवसांपासून लसीकरण बंद आहे.
लवकरच उपलब्ध होणार
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरू होईल. लसीकरणासाठी येतांना नागरिकांनी तोंडावर मास्क वापरावे व लसीकरण झाल्यानंतरही स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी व आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. - डाॅ. एम. बी. घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, वहवणी