लस सुरक्षित; आम्ही घेतली, तुम्ही पण घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:53+5:302021-02-13T04:32:53+5:30
बीड : कोरोना लसीकरणात सुरुवातीला राज्यात अव्वल असणाऱ्या बीड जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी झाली आहे. हा टक्का ...
बीड : कोरोना लसीकरणात सुरुवातीला राज्यात अव्वल असणाऱ्या बीड जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी झाली आहे. हा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शुक्रवारी ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्यांनी ही लस घेत ही लस सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तसेच आम्ही लस घेतली, तुम्ही पण घ्या, असे आवाहन हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला केले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला हेल्थ केअर वर्कर्सला ही लस देण्यात आली. आता फ्रंटलाईन वर्कर्सलाही यात सहभागी करून घेण्यात आले आहे. परंतु अद्यापही फ्रंटलाईन वर्कर्स लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. तसेच हेल्थ केअर वर्कर्सची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे सुरूवातीला अव्वल असणारा बीड जिल्हा आता खूप खालच्या स्थानावर पोहचला आहे. हाच धागा पकडून शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी कोरोना लस घेतली. त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, नोडल ऑफिसर डॉ. बाबासाहेब ढाकणे, डॉ.मनिषा पवार, हातवटे, बागलाने, राजेश मस्के यांनीही लस घेतली. या सर्वांनी नंतर लस घेणे बाकी असलेल्यांना आवाहन केले. ही लस सुरक्षित असून सर्वांनी पुढे येत मनात गैरसमज न ठेवता लस घ्यावी, असे सांगितले. यावेळी बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, डॉ. सचिन आंधळकर आदींची उपस्थिती होती.
कोट
कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही लस घेतली असून आम्हाला कसलाही त्रास नाही. त्यामुळे मनातील गैरसमज दूर करून नोंद केलेल्या लाभार्थ्यांनी पुढे येत ही लस घ्यावी.
डॉ. आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
कोट
लस देताना समजले पण नाही. लस सुरक्षित असल्याने माझ्यासह इतर सहकाऱ्यांनाही कसलाच त्रास जाणवत नाही. हेल्थ केअर व फ्रंटलाईन वर्कर्सनी पुढे येऊन ही लस घ्यावी. यामुळे आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहील.
डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा