वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:11+5:302021-07-31T04:34:11+5:30
परळी : येथील दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा गुरुवारी सायंकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या ...
परळी : येथील दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा गुरुवारी सायंकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा दिला आहे. दहा वर्षांपासून ते बँकेचे अध्यक्ष होते. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. शहरातील व्यापारी, बँकेचे संस्थापक अध्यक्ष रतिलाल मोमया यांनी व्यापाऱ्यांना एकत्रित करून वैद्यनाथ अर्बन बँकेची १९६६ मध्ये स्थापना केली. त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे, अशोक सामंत यांचे नेतृत्व या बँकेस लाभले. बँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून, राज्यात एकूण ४१ शाखा आहेत, ठेवी ९५० कोटी एवढ्या आहेत. मुंडे परिवाराचे विश्वासू अशोक जैन यांनी ११ जुलै रोजी २०११ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. अशोक जैन यांच्या काळात बँकेचा शाखा विस्तार झाला. बँकेच्या ठेवी ९५० कोटी झाल्या आहेत.
अशोक जैन यांच्या राजीनाम्यानंतर वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे. बँकेच्या अध्यक्षपदासाठी विनोद अशोक सामत यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सामत हे सध्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सामत यांचे पुत्र आहेत.
....
आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. मला गेल्या दहा वर्षात सर्वांचे सहकार्य लाभले. सर्व संचालकांनी वेळीवेळी सहकार्य केले आहे. बँकेचे खातेदार, सभासद यांनी विश्वास टाकल्यामुळे बँकेची प्रगती करू शकलो. यापुढेही आपण बँकेच्या हितासाठी काम करणार आहे.
- अशोक जैन, परळी
....
300721\img-20210730-wa0381_14.jpg