श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:32 PM2022-08-08T19:32:57+5:302022-08-08T19:33:13+5:30
प्रभू वैद्यनाथा चरणी माजी मंत्री धनंजय मुंडें यांच्यासह हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन
- संजय खाकरे
परळी (बीड) - दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून रीघ लागली होती. विशेष म्हणजे, पहिल्या श्रावण सोमवार पेक्षा आज भाविकांची गर्दी अधिक होती. प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करीत हजारो शिव भक्तांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
महिलांनी तिळाची शिवमुठ वाहून तर पुरुषांनी बिल्वपत्र अर्पणकरून वैद्यनाथाचे दर्शन घेतले. आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मनोभावे वैद्यानाथाचे दर्शन घेतले. तसेच मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत वैद्यनाथ मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. अत्यंत आकर्षक सजावट व विविध फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा आदी ठिकाणी करण्यात करण्यात आली आहे. मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, यासह सुमारे २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पवित्र श्रावण महिन्यात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक श्रावण सोमवारी याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठानच्यावतीने मंदिरात फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.