वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 10:14 PM2019-03-03T22:14:08+5:302019-03-03T22:14:16+5:30

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ सुरु 

vaijnath devasthan trust organises yatra mahotsav on the occasion of mahashivratri | वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन 

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन 

Next

परळी: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे अयोजन करण्यात आले असून रविवार दि. 03 ते 07 मार्च दरम्यान वैद्यनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शनिवारपासूनच राज्य व परराज्यातून भाविकांची गर्दी सुरु झाली आहे. रविवारीही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
 
4 मार्च रोजी महाशिवरात्र असल्याने वैद्यनाथ मंदिरात हजारो भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून धर्म दर्शन मध्ये पुरुष व महिलांच्या दोन स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत. याशिवाय पास धारकांची स्वतंत्र रांग असेल. प्रवेशिका पत्रिका (पास) सोय करण्यात आली आहे. दर्शन पासचे शुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे. चार मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8 च्या दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते वैद्यनाथास रुद्र अभिषेक करण्यात येणार आहे. या अभिषेकानंतर भाविकांना अभिषेकास परवानगी देण्यात येणार आहे. अभिषेकासाठी एका आवर्तनास शंभर रुपये व सपत्नीक दीडशे रुपये असतील. परळी परिसरातील शिवभक्तांसाठी विनामूल्य पास लाईन दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चार मार्च रोजी रात्री 10 पासून ते रात्री 12 पर्यंत पासच्या रांगेतून विनामूल्य दर्शन घेता येईल. त्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ओळखीचा पुरावा दाखवावा लागेल. 

5 मार्च रोजी प.पु.सोमयाजी दीक्षित यज्ञेश्‍वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ मंदिर जवळील प्रांगणात श्री सुक्त हवन होणार आहे. तसेच परिसरातील सर्व शिव भक्तांना दर्शन मंडप येथे महाप्रसादाची व्यवस्था दुपारी 12 ते 4 दरम्यान करण्यात आली आहे. 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता श्री वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल. सायं. 6 वा. देशमुखपाराजवळ सुप्रसिध्द गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांचा भक्तीगीत व अभगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. अंबवेस येथे रात्री 9 वाजता शोभेचे फटाके उडविण्यात येतील. त्यानंतर गणेशपार, नांदुरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंताची हजेरी होईल. नंतर अंबवेस, भोईगल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल. 7 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 वैद्यनाथ मंदिरात मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम होईल. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ.विपिन विलासराव पाटील व सचिव राजेश देशमुख आणि विश्‍वस्त मंडळाने केले आहे. 

वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यावर लोखंडी बॅरिकेट्स उभारण्याचे काम पूर्ण झाले असून ऊनापासुन बचाव व्हावा म्हणून भव्य मंडप टाकण्यात आला आहे. मंदिरात रंगरंगोटी करुन विद्युत रोषणाई करुन करण्यात आली आहे. 

असा आहे पोलीस बंदोबस्त 
शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. वैद्यनाथ मंदिरात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, सहा पोलिस निरीक्षक, 26 पोलिस अधिकारी, 260 पोलिस कर्मचारी, 70 महिला पोलिस कर्मचारी, एस.आर.पी.ची एक प्लॅटुन, आर.सी.पी.चे एक प्लॅटुन, क्यु.आर.टी.चे दोन प्लॅटुन, 100 होमगार्ड असा बंदोबस्त असेल. बॉम्ब शोध व नाशक पथक, दरोडा प्रतिबंधात्मक पथक, एलसीबी पथक तैनात असेल अशी माहिती परळी शहरचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके व संभाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली यात्रा महोत्सवात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे मंदिराच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. 

वाहनाधारकांनी महाशिवरात्रीच्या काळात वैद्यनाथ मंदिराकडे येताना उड्डानपूल मार्गे शिवाजी चौक मार्गे नवगण कॉलेज रोड रस्तयाचा वापर करावा. नवगण कॉलेज रोडवरील प्रांगणात पोलिस अधिकारी निवासस्थान जवळ पार्किंगची सोय करण्यात आली आहे.  आर्य वैश्य मंगल कार्यालयाकडे येणार्‍या वाहनांसाठी तोतला मैदाना जवळ वाहनांची पार्किंगची सोय राहील. अशी माहिती शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली. महाशिवरात्री निमित्त तोतला मैदान येथे राहाट पाळणे, खेळणी साहित्याचे दुकाने थाटण्यात आली आहेत.
 
मयुर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने अश्‍व स्पर्धा 
मयुर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने महाशिवरात्री निमित्त सोमवारी सकाळी 10 वाजता भव्य अश्‍व स्पर्धा, प्रदर्शन व बाजार तहसील कार्यालया समोरील मैदानात होणार आहेत. याचे उदघाटन  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन परळी पंचायत समितीच्या सभापती सौ.कल्पना मोहन सोळंके, नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे,  बाजार समिती सभापती अ‍ॅड.गोविंद फड, आयुब पठाण, प्रा.विजय मुंडे, अनिल अष्टेकर, बाजीराव धर्माधिकारी, संजय फड आदी उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मयुर हॉर्स रायडिंग कल्बचे अध्यक्ष डॉ.सुरेश चौधरी, सचिव विशाल देशमुख, व कार्याध्यक्ष अ‍ॅड.शशि शेखर चौधरी यांनी केले आहे. 
 

Web Title: vaijnath devasthan trust organises yatra mahotsav on the occasion of mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड