पितृछत्र हरवलेल्या वैष्णवीला मिळाले सामाजिक छत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:06+5:302021-09-07T04:40:06+5:30
अंबाजोगाई : वडिलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवी परमेश्वर रोडे या विद्यार्थिनीला ११ वी विज्ञान व नीटसाठी विनाशुल्क प्रवेश देत ...
अंबाजोगाई : वडिलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवी परमेश्वर रोडे या विद्यार्थिनीला ११ वी विज्ञान व नीटसाठी विनाशुल्क प्रवेश देत येथील सिनर्जी स्कूलने सामाजिक दायित्व जपले.
परळी तालुक्यातील मिरवट येथील अनुराधा रोडे यांच्या पतीचे २००९ मध्ये निधन झाले. त्यांच्या दोन मुली व एका मुलाचे शिक्षण व उदरनिर्वाहासाठी त्यांनी शिवणकाम करून कष्ट घेतले. वैष्णवीला इयत्ता दहावीमध्ये ९३ टक्के गुण प्राप्त झाले. परंतु पुढील विज्ञान शाखेतील शिक्षण घेण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने रोडे कुटुंब चिंतेत होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष संदीपान रेड्डी, सचिव रमाकांत माने, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. अनिल भुतडा, प्राचार्य सागर, प्रा. समीर, प्रा. जोशी, खंडेलवाल यांनी सहकार्य केले. वैष्णवीची प्रवेश प्रक्रिया ॲड. संतोष पवार, रचना परदेशी तसेच कॉलेजचे विद्यार्थी व प्राचार्य, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पूर्ण झाली.
गुणवत्ता अन् जिद्दीला दाद
मिरवट येथील शिक्षक कुचेकर यांनी वंचित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणारे आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांना वैष्णवीच्या पुढील शिक्षणासाठी विनंती केली. ॲड. पवार यांनी सिनर्जी स्कूलच्या संचालक मंडळासमोर वैष्णवीच्या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती दिली. वैष्णवीची गुणवत्ता व शिक्षणाची जिद्द पाहून सिनर्जी स्कूलनेही वेळ न दवडता ११ वी विज्ञान शाखेच्या नीट अभ्यासक्रमासाठी विनाशुल्क प्रवेश देऊन तिला पुस्तके व स्कूलबसची सुविधाही उपलब्ध करून दिली.
050921\0832img-20210903-wa0046.jpg
फोटो