वंचित बहुजन आघाडीला खिंडार; उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर मनसेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 10:28 PM2022-08-23T22:28:53+5:302022-08-23T22:32:02+5:30
आपला कोणावरही वैयक्तिक राग नसून समर्थक, सहकाऱ्यांच्या भावनेचा आदर ठेऊन मनसेत जाण्याचा निर्णय घेतला असं प्रा. बांगर यांनी म्हटलं.
सोमनाथ खताळ
बीड : वंचित बहुजन आघाडीतील ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात हा कार्यक्रम पार पडला. सर्वसामान्यांसह ऊसतोड कामागर प्रश्नी आवाज उठवत राहू, अशी ग्वाही प्रा.बांगर यांनी दिली.
यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे, बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदी उपस्थित होते. प्रा.शिवराज बांगर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीमध्ये जीवाचे रान करून कार्य केले. परंतु, मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले, तेव्हा माझ्यावरील गुन्हा व एमपीडीएची कारवाई ही वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे सांगत पक्षाकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे आपला कोणावरही वैयक्तिक राग नसून समर्थक, सहकाऱ्यांच्या भावनेचा आदर ठेऊन मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत चळवळीत काम केले असून ऊसतोड कामगारांसह गोरगरीबांच्या प्रश्नावर आवाज उठवत आलो आहे. येत्या काळात मनसेत संघर्ष करू, ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही बांगर म्हणाले.
वंचितकडूनही बांगर यांना प्रत्युत्तर
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आंदोलन पुकारले असता फेसबुकवरून पोलिसांविरुध्द आक्षेपार्ह व अर्वाच्य भाषेत लिहिल्यामुळे पोलिसांनी आपणांस ताब्यात घेतले होते तेव्हा पक्षश्रेष्ठींनी रात्रीतून आपल्याला बाहेर काढले. आपला पिंड संघटन वाढवण्याचा नाही तेव्हा आपण एखादा मतदार संघ घेऊन निवडणुकीची तयारी करा असा सल्ला आपल्याला वेळोवेळी दिला. तो मानला असता तर काही ठोस काम झाले असते. परंतू आमचा सल्ला आपण मानला नाही व आपण मागितलेल्या जबाबदाऱ्या आपल्याला दिल्या. आपण त्या पार पाडू शकला नाही. कार्यकर्त्यांना पक्षाबाहेर काढण्याची पक्षाची भूमिका नाही. पक्ष फक्त पदामध्ये बदल करत असतो. जबाबदार्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना देत असतो. पक्ष आपल्यापाठी वारंवार उभा राहिल्या नंतरही आपणच सोशल मीडियावर पक्षाविरुद्ध लिहले आहे व राजीनामा दिला आहे तो प्रत्यक्षात पक्ष कार्यालयाला मिळालेला नाही परंतू तरीही तो आम्ही स्वीकारला आहे असं सांगत वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.