परळीत श्री वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड, पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 07:20 PM2024-10-13T19:20:16+5:302024-10-13T19:20:58+5:30

मंदिराच्या शिखरात महादेवाची पिंड असल्याचा दावा करत ही तोडफोड करण्यात आली.

Vandalism of Shri Vaidyanath temple in Parli, complaint in police station | परळीत श्री वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड, पोलीस ठाण्यात तक्रार

परळीत श्री वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड, पोलीस ठाण्यात तक्रार


परळी- देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर चढून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या शिखराकडे जाणाऱ्या दरवाजाचे कुलूप तोडून शिखराच्या पूर्व बाजूची तोडफोड केल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी सकाळी 11 च्या सूमारास घडली. याप्रकरणी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह आठ ते दहा जणांनी विजयादशमीच्या दिवशी सकाळी वैद्यनाथ मंदिर कमिटीच्या कार्यालयासमोर असलेल्या गेटचे कुलूप तोडून शिखरावर पोहोचले. यानंतर हातोड्याने शिखराच्या पूर्व बाजूची भिंत फोडून दीपक देशमुख आपल्या साथीदारांसह आत घुसले. याचा व्हिडिओ दीपक देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

शिखराच्या तोडफोडप्रकरणी मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कमिटीच्या कार्यालयास माहिती दिली, त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ याप्रकरणी परळी शहर  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारपर्यंत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार आल्याचे परळी शहराचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले. 

दीपक देशमुख काय म्हणाले?
पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ येथे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर कळसातील महादेव दर्शन शिवभक्तांसाठी खुले केले. अनेक वर्षापासून बंद असलेल्या कळसातील भुयारात महादेवाची पिंड बंदिस्त होती. अनेक दिवसांपासून भक्तांची व माझी मागणी होती की, हे द्वार दर्शनासाठी खुले करावे. वैद्यनाथ देवल कमिटीच्या विश्वस्तांना अनेकवेळा निवेदन दिले, परंतु काहीही दाद न दिल्यामुळे मी व माझ्या सहकारी शिवभक्तांनी मंदिरात असणाऱ्या कळसातील महादेव दर्शन सर्वांसाठी खुले केले, अशी प्रतिक्रिया दीपक देशमुख यांनी दिली.
 

Web Title: Vandalism of Shri Vaidyanath temple in Parli, complaint in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.