पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर ‘वर्गोन्नत’ उल्लेख राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:42+5:302021-05-09T04:34:42+5:30
शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रगतीपत्रकावर कोरोनाचा उल्लेख होणार काय, हेही पहावे लागणार आहे. संकलित व आकारिक मूल्यमापनावर गुणपत्रक आरटीई ॲक्ट २००९ ...
शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रगतीपत्रकावर कोरोनाचा उल्लेख होणार काय, हेही पहावे लागणार आहे. संकलित व आकारिक मूल्यमापनावर गुणपत्रक आरटीई ॲक्ट २००९ चे कलम १६ नुसार देण्याबाबत निर्देश असल्याचे शिक्षक सांगतात. मागील वर्षी मार्चमध्ये २०१९-२० वार्षिक परीक्षा तोंडावर असताना शाळा बंद झाल्या होत्या; मात्र शैक्षणिक वर्षातील जून ते मार्चपर्यंतच्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना प्रगतीपत्रक देण्यात आले होते.
प्रगतीपत्रकच बदलणार
२०२०-२१ मध्ये वर्गच भरले नाही, शिक्षक अध्यापन करू शकले नाही. बहुतांश ठिकाणी तर विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट झाली नाही. शाळेमध्ये खेळ, कला, स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माहितीचे संकलन करता आले नाही. त्यांची उंची, वजन, शाळेची उपस्थिती नोंदवता आली नाही. त्यामुळे गुणपत्रिकेवर उन्नत असा उल्लेख होणार आहे.
यंदा शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थी प्रमोट करण्यात आले आहेत. ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पहिली ते चौथीच्या शाळा बंदच राहिल्या. लेखी परीक्षा झाल्या नाहीत. शासनाचे निर्देश आल्यानंतर प्रगतीपत्रकातील मुद्दे स्पष्ट होतील, सध्या तरी वर्गोन्नतच म्हणावे लागेल. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)
-----------
लॉकडाऊनमुळे शाळेत जाता आले नाही. घरीच इंग्लिश आणि मॅथचा अभ्यास करत होते. ऑनलाइनपण होते की. थोडा वेळ खेळतही होते; पण शाळाच बंद असल्याने घरी कंटाळा आला आहे. आता मी दुसरीत जाणार; पण शाळा सुरू होणार आहेत का? - मैथिली अमोल पाटील, विद्यार्थी.
-----------
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. घरीच आजोबा, आई अभ्यास करून घेत होते. शाळेकडून ऑनलाइन अभ्यास देत होते. घरातच टीव्ही पहायचे, मोबाइलवर खेळायचे, यामुळे कंटाळा आला आहे. पप्पा म्हणतात, सुटी संपल्यानंतर शाळेत जायचे आहे. - देवेश रवींद्र आघाव, विद्यार्थी.
------
मी शाळाच पाहिली नाही. ताई कोण, सर कोण माहीत नाही. मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास केला. घरातच असल्याने मम्मी, पप्पा नेहमी अभ्यास कर म्हणत असतात. आता मी दुसरीत गेले आहे. - दिशा लक्ष्मीकांत बियाणी, विद्यार्थी.
---------
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे मैत्रिणींना भेटता आले नाही; पण ते चांगलेच झाले. यावेळी १ मे रोजी निकाल लागला नाही, त्यामुळे गुणपत्रिकेसाठी शाळेत जाता आले नाही. आता मी पाचवीत जाणार आहे. - अक्षदा घनश्याम पतंगे, विद्यार्थी.
-----------------
पहिलीतील विद्यार्थी - ५४७१४
दुसरीतील विद्यार्थी - ५०६०७
तिसरीतील विद्यार्थी - ५२२२१
चौथीतील विद्यार्थी - ५३०३६
--------