लग्नमंडपातून वराच्या बहिणीची पर्स लंपास; दीड लाखाचे दागिने चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:48 PM2018-03-06T23:48:39+5:302018-03-06T23:48:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मागील महिन्यात शहरातील गुरुवार पेठ भागातील एका मंगलकार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गॅस सिलेंडरने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : मागील महिन्यात शहरातील गुरुवार पेठ भागातील एका मंगलकार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. याचाच गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी नवरदेवाच्या बहिणीची पर्स लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख ६६ हजारांचा ऐवज होता. ५ मार्च रोजी याची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.१५ वाजता गुरुवार पेठ भागातील एका मंगल कार्यालयात अश्विन भरतकुमार शर्मा यांच्या बहिणीचा विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्न समारंभ सुरु असताना अचानकच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि धावपळ सुरु झाली. काही तरुणांनी धाडसाने हे सिलेंडर बाहेर आणत आगीवर नियंत्रण मिळविले. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगल कार्यालयात प्रवेश करून नवरदेवाची बहीण पायल धीरज शर्मा (रा. कात्रज, पुणे) यांची पर्स लंपास केली.
या पर्समध्ये मोबाईल, सोन्याचे बाजूबंद, बोरमाळ, हार, चांदीचे पैंजण असा एकूण १ लाख ६६ हजाराचा ऐवज होता. रात्री १० वाजता पायल शर्मा यांना पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, सर्वांकडे चौकशी केली पण पर्सबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. अखेर ५ मार्च रोजी अश्विन शर्मा यांनी पर्स चोरीला गेल्याची तक्रार अंबाजोगाई शहर पोलीसात दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.