माणसातील नैराश्याचा विशाल घेतोय शोध; सायकलवर भारत भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:27+5:302021-01-02T04:27:27+5:30
अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य ...
अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य व उदासिनतेचे योग्य मूळ शोधता आलेले नाही. याच्या मुळाशी जाऊन उदासिनता शोधण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील एक युवक सहा महिन्यांपूर्वी सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाला आहे. दोन दिवसांपूर्वी कटोल तालुक्यातील (जि. नागपूर) विशाल मनोज टेकाडे हा अंबाजोगाई शहरात पोहोचला. येथील मानवलोक संस्थेत मुक्काम करून त्याने विविध क्षेत्रातील लोकांची भेट घेतली. अगदी रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांशीही त्याने चर्चा केली.
ज्याला प्रश्न पडत नाहीत तो माणूस कसला? बीबीएचा पदवीधर असलेल्या विशाललाही एके दिवशी हा प्रश्न पडला. कुठल्याही लहान-सहान नकारात्मक गोष्टीवर माणूस उदास होतो. विशालच्या म्हणण्यानुसार देशातील ५० टक्के माणसे उदासिन आहेत. ही उदासिनता का आहे, याचा शोध प्रत्येक राज्यात जाऊन फिरल्याशिवाय घेता येणार नाही. त्यामुळे त्याने भारत भ्रमण करण्याचे ठरवले. दुचाकीवर जायचे म्हटले तर खर्च येतो, मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा विचार करुन सायकलवरुनच भारत भ्रमण करण्याचे ठरवले. दिनांक ६ जूनपासून त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
राज्यातील विविध भागात फिरत तीन दिवसांपूर्वी (२४ डिसेंबर रोजी) तो अंबाजोगाईत आला. यावेळी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्याशी त्याची भेट झाली. त्यामुळे तिथेच राहून शहर परिसर व मानवलोक संस्थेचे उपक्रम त्याने पाहिले. तिथे चालणारे कामही त्याने जाणून घेतले. यातूनच त्याची व सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे यांची भेट झाली.
जिद्द व चिकाटी असलेला तरुण
विशाल २१ वर्षांचा आहे. आई-वडिलांचा विरोध असतानाही आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे मूळ शोधण्यासाठी तो भ्रमंती करत आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुभवलेले प्रसंगही त्याने सांगितले. पोलिसांनी कुठेही अडवले नाही. परंतु, काही गावांमध्ये प्रवास करण्यास मज्जाव झाल्याने, रात्रीही प्रवास करावा लागला.
शेतकऱ्यांचे जीवनमान अनुभवले
या प्रवासात विशालने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे जीवनही अनुभवले. नव्हे तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही घेतला. जनावरांना चारा कापून टाकणे यासह इतर कामेही केल्याने शेतकऱ्यांची मानसिकता व त्यांच्या परिस्थितीची जाणीव त्याला झाली.
अहंकार व स्वार्थ
या १९८ दिवसांच्या प्रवासात त्याला नैराश्याच्या दोन बाबी लक्षात आल्या. प्रामुख्याने निसर्ग नियमानुसार आपण स्वत:ला स्वीकारले नसल्याची जाणीव झाली. अहंकार व स्वार्थ ही दोन कारणेही त्याला जाणवली. माणूस शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी असला, तरी मानसिकदृष्ट्या परावलंबी होत चालला आहे. माणूस अहंकारप्रिय होत चालल्याने अश्रू आणि हसू हे स्वत:चे राहिलेले नाहीत, असे तो सांगतो. अंबाजोगाईनंतर तो लातूरमार्गे कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू असा प्रवास करणार आहे.