रुग्णालयात नेताना वाहन, परत घरी जाताना पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:14+5:302021-04-07T04:34:14+5:30
अंबाजोगाई : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बाधित रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका काही वेळातच संबंधित रुग्णाच्या दारात उभी राहते. ...
अंबाजोगाई : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बाधित रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका काही वेळातच संबंधित रुग्णाच्या दारात उभी राहते. मात्र, उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना चक्क पायपीट करत घरी जावे लागते. तर बाहेरगावच्या रुग्णांना रुग्णवाहिकेची सोय होईपर्यंत रुग्णालयातच थांबण्याची वेळ येते.
अंबाजोगाई येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दोन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लोखंडी येथील कोविड केअर सेंटर, अशा दोन ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांना वर्गवारीप्रमाणे ठेवण्यात येते. अतिगंभीर रुग्ण स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी असतात. तर प्राथमिक अवस्था व बऱ्यापैकी असणारे रुग्ण लोखंडी सावरगाव अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचारासाठी असतात. परळी, धारूर, केज, माजलगाव या ठिकाणचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. बीड जिल्ह्यात बीडनंतर अंबाजोगाईत उपचाराची मोठी सोय उपलब्ध असल्याने रुग्णसंख्या अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात असते. कोरोनाच्या रुग्णांना सात दिवसांपासून चौदा दिवसांपर्यंत रुग्णालयात ठेवून उपचार केले जातात.
कोरोनाची चाचणी झाल्यानंतर जे बाधित रुग्ण आहेत, त्यांना तत्काळ संपर्क साधून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका दारात उभी केली जाते व त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली जाते. बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही तपासणीसाठी रुग्णवाहिका येते.
अंबाजोगाई येथे लोखंडी सावरगाव येथे नव्याने सुरू झालेल्या कोविड कक्षात ३५० ते ४०० रुग्ण एकाच वेळी उपचार घेतात. या रुग्णालयात केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने सुट्टी दिलेल्या रुग्णांना घरी नेऊन सोडताना एकच वाहन असल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडू लागली आहे. बाहेरगावच्या प्रवाशांना सुट्टी झाली तरी वाहनाअभावी रुग्णालयातच राहावे लागते. जेव्हा वाहन उपलब्ध होईल तेव्हा त्यांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जाते. तर अंबाजोगाईतील रुग्ण अनेक वेळा पायपीट करत आपले घर गाठतात. रुग्णालयात नेताना वाहन अन् घरी जाताना पायपीट अशी स्थिती कोरोनारुग्णांची झाली आहे.
या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्याकडे विचारणा केली असता सध्या लोखंडी सावरगाव येथे एकच रुग्णवाहिका कार्यान्वित आहे. ती रुग्णवाहिका फक्त रुग्णालयातील रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यासाठी स्वा.रा.ती. रुग्णालयात घेऊन जाणे, या कामातच गुंतलेली असते. त्यामुळे रुग्णांना घरी पोहोचण्यासाठी वाहनाची उपलब्धता नाही. नवीन रुग्णवाहिका मागविण्यात आल्या आहेत व यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. लोमटे म्हणाले.
बिल थकल्याने खासगी वाहनचालक येईनात. गेल्या मार्च महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसेवेसाठी आरोग्य प्रशासनाने खासगी वाहनांची तरतूद रुग्णसेवेसाठी केली होती. मात्र, खासगी वाहनचालकांना सेवा दिलेल्या कालावधीतील भाड्याची रक्कम व डिझेलची रक्कम अद्यापही प्राप्त झाली नसल्याने स्सजगी वाहनचालक पुन्हा रुग्णालयाला भाड्याने गाड्या देण्यासाठी धजावत नाहीत. तर शासनाने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या नाहीत. याचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे.