पहिल्याच दिवशी १४ विद्यार्थी रस्टीकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:47 PM2019-02-21T23:47:54+5:302019-02-22T00:00:40+5:30
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना आढळलेल्या १४ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले.
बीड : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना आढळलेल्या १४ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले.
जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ३९ हजार १२२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा होता. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उपाय केले असलेतरी केंद्राबाहेर काही ठिकाणी लगतच्या इमारतीवर, छतावर चढून कॉप्या पुरविण्याचे प्रयत्न काही लोक करत होते.
परीक्षा नियंत्रणासाठी पाच भरारी पथके तर ८५ बैठे पथक नेमले होते. परीक्षा हॉलमध्ये गाईड, अपेक्षित, पुस्तकांचा वापर करुन कॉपी करणारे विद्यार्थी दिसून आले. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील जामगाव येथील निवृत्ती धस कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर २, आष्टी येथील पं. जवारलाल नेहरु कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर २ तर भगवान विद्यालय केंद्रावर २ अशा सहा विद्यार्थ्यांवर शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने रस्टीकेटची कारवाई केली. बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील गोरक्षनाथ विद्यालय केंद्रावर शिक्षणाधिकारी (प्रा.)राजेश गायकवाड यांच्या पथकाने २ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. शिरुर तालुक्यातील मानुर येथील रेणुका विद्यालय केंद्रावर गटशिक्षणाधिकारी जमीर यांच्या पथकाने २ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तसेच आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालय केंद्रावर २ तर कडा येथील श्रीराम विद्यालय केंद्रावर १ अशा तीन विद्यार्थ्यांवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली. एकूण १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा संनियंत्रण कक्षाचे अधीक्षक राजेश खटावकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एक. के. गुंड यांनी सांगितले.