टेंडरच्या वादातून उपसरपंचांने रोखली पंचायत समिती सदस्यावर बंदूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 07:24 PM2018-10-03T19:24:29+5:302018-10-03T19:25:13+5:30
रस्त्याच्या कामाच्या टेंडरवरील वादातून देवगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचाने केज पंचायत समितीच्या एका सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
केज (बीड ) : मंजूर रस्त्याच्या कामाच्या टेंडरवरील वादातून देवगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचाने केज पंचायत समितीच्या एका सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपसरपंचासह तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा नियोजन समितीने विडा ते लेमनदरा या रस्त्याचे काम मंजूर केले आहे.याच्या कामाचे टेंडर वडवणी येथील एका अभियंत्याने भरले आहे. मात्र, हा रस्ता देवगाव ग्रामपंचायतिच्या हद्दीत येत असून हा रस्ता आम्ही मंजूर करून आणला आहे, दत्तात्रय ठोंबरे यांच्या सांगण्यावरून दुसऱ्याने याच्या कामाचे टेंडर भरले असा आरोप उपसरपंच अतुल मुंडे यांनी केला.
या रागातूनच मुंडे यांनी ठोंबरे यांची चारचाकी गाडी आडवून त्यांच्यावर रिव्हाल्व्हर रोखत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दत्तात्रय ठोंबरे यांनी दिली आहे. यावरून अतुल मुंडे आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष कदम करत आहेत.