पीडिता नातेवाईक फितूर, न्यायवैद्यक पुराव्यावरून अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा
By संजय तिपाले | Published: September 29, 2022 05:37 PM2022-09-29T17:37:30+5:302022-09-29T17:40:13+5:30
अत्याचार केल्यानंतर आरोपीने पिडीतेचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले
बीड: अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करुन नंतर तिचे अश्लील फोटो व्हॉटस्अप स्टेटसला ठेऊन बदनामी करणाऱ्रूा तरुणास येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी दहा वर्षांची सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दोन वर्षांपूर्वी नेकनूर ठाणे हद्दीतील घटनेत २९ सप्टेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. विशाल शरद शेळके (वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी व आरोपी एकाच गावचे रहिवासी असून नातेवाईक आहेत.
१९ ऑक्टोबर २०२० रोजी पीडित मुलगी शेतातील ओढ्यातून घराकडे येत होती. यावेळी विशाल शेळके याने तिला वाटेत अडवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिचे अश्लील फोटो काढून त्याने तिला चापटाबुक्क्याने मारहाण करुन उद्या याच ठिकाणी भेटायला ये म्हणून सांगितले. पीडिता भेटायल न गेल्यावर त्याने तिचे अश्लील फोटो व्हॉटस्अप स्टेटसला ठेऊन तिची बदनामी केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पीडितेने त्याच्याविरुध्द नेकनूर ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पो.नि.प्रदीप त्रिभुवन यांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
पीडिता फितूर, न्यायवैद्यक चाचणी अहवाल महत्त्वाचा
सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. मात्र, पीडितेसह तिचे नातेवाईक फितूर झाले. मात्र, न्यायवैद्यक चाचणी अहवालातून अश्लील फोटो आरोपीने स्वत:च्या मोबाइलने काढल्याचे सिध्द झाले तसेच ते फोटो त्याच्याच मोबाइलमधून हस्तगत केले. हे फोटो पीडितेचे असल्याने एका साक्षीदाराने आळखले. त्यावरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.