बीड जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून सूडाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:35 PM2019-03-15T23:35:18+5:302019-03-15T23:37:08+5:30
बीड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आमच्याशी सतत सूडाचे राजकारण करुन सातत्याने शिवसंग्रामचा अपमान केला. दुष्काळासारख्या परिस्थितीतही छावण्या ...
बीड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आमच्याशी सतत सूडाचे राजकारण करुन सातत्याने शिवसंग्रामचा अपमान केला. दुष्काळासारख्या परिस्थितीतही छावण्या मंजूर करताना राजकारण केले. आम्ही दाखल केलेल्या विकास कामांना एक दमडीही दिली नाही. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला वेळोवेळी विकास कामांसाठी मदत केली त्यामुळे राज्यात शिवसंग्राम ही भाजपासोबत असेल, परंतु बीड जिल्ह्यात मात्र भाजपाचा प्रचार करणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. विनायक मेटे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
जवळपास एक वर्षांपासून पंकजा मुंडे आणि आ. विनायक मेटे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. हा वाद अनेकदा जाहीररीत्या उफाळलेला जिल्ह्याने बघितला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीतील घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामने काय भूमिका घ्यावी? या संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी बीड येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जिल्ह्यातून शिवसंग्रामचे पदाधिकारी आले होते. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी भाजपासोबत काम करू नये, अशा भावना व्यक्त करताना भाजपाने आतापर्यंत शिवसंग्राम आणि कार्यकर्ते, पदाधिकाºयांचा अपमानच केला आहे. अनेकांनी भाजपाला सोडून इतरांशी मैत्री करावी, असे अनेक सल्ले बोलताना दिले. एकंदरीत बैठकीचा सूर हा भाजपापेक्षाही पंकजा मुंडे यांच्या आतापर्यंतच्या दिलेल्या वागणुकीच्या विरुद्ध होता.
या संदर्भात बोलताना आ. विनायक मेटे म्हणाले, आपल्या मी भावना समजू शकतो. जिल्ह्यात जरी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामसोबत सूडाचे राजकारण केले. अनेकवेळा हटवादी भूमिका घेतली. हा अपमान आम्ही युतीतील एक घटक पक्ष म्हणून सहन करीत गेलो. आता मात्र डोक्यावरुन पाणी जात असल्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदाचा सोक्षमोक्ष होणे गरजेचे आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये भाजपाच्या केवळ १९ जागा निवडून आल्या असतानाही मी पुढाकार घेऊन अशक्यप्राय असलेली सत्ता भाजपाला जि.प.मध्ये मिळवून दिली. बदल्यात मात्र आम्हाला अपमानच सहन करावा लागला.
बीड नगरपालिका निवडणुकीतही शिवसंग्रामला सोबत घेऊन भाजपाने निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले होते, परंतु आमचे प्रतिस्पर्धी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हितासाठी पालकमंत्र्यांनी आम्हाला विचारले नाही, असा आरोपही आ. मेटे यांनी यावेळी केला. त्यांनी नेहमीच आमच्याकडे संशयाने बघितले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे सहकार्य : राज्यात सहकार्य
पालकमंत्र्यांनी जरी आम्हाला टाळले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आम्हाला विकास कामांसाठी वेळोवेळी सहकार्य करुन निधी दिला. श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकास कामांसाठी त्यांच्यामुळेच जवळपास ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. महामंडळाच्या नियुक्तीच्या माध्यमातून शिवसंग्रामच्या ५ कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग दिला. मराठा आरक्षण, विकास निधी यासाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका सहकार्याचीच राहिली आहे. त्यामुळे राज्यात आम्ही भाजपासोबत खांद्याला खांदा लावून असूत, परंतु बीड जिल्ह्यात मात्र शिवसंग्राम भाजपाचा प्रचार करणार नाही, असे मेटे म्हणाले.