VIDEO - अंबाजोगाईत लघु सिंचन तलाव फुटला
By admin | Published: October 1, 2016 05:25 PM2016-10-01T17:25:25+5:302016-10-01T18:15:30+5:30
अंबाजोगाई येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुटला. त्यामुळे धसवाडी व वाघदरवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
घाटनांदूर, दि. १ - येथून जवळच असलेल्या वाघदरवाडी तालुका अंबाजोगाई येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुटला. त्यामुळे धसवाडी व वाघदरवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. सत्तर एकरपेक्षा अधिक जमिनीवरील पिके वाहून गेल्याने शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले.
वाघदरवाडी हे गाव लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. येथील लघु सिंचन तलाव गत आठवड्यातील धुवाधार पावसाने भरला होता. या तलावाच्या मधोमध चिर पडली होती. त्यातून पाणी ठिबकत होते. शनिवारी सकाळी या भिंतीला भगदाड पडले. त्यानंतर धो- धो पाणी वाहू लागले. वाट मिळेल तिकडे पाणी वाहत होते. तलावाखालील जमिनी पिकांसह वाहून गेल्या. घटनेचे वृत्त कळताच नागरिकांची धांदल उडाली. तब्बल पाच तासानंतर पाणी ओसरले.
वाघदरवाडी येथे तहसीलदार शरद झाडके यांनी भेट देवून पाहणी केली . दरम्यान या तलावाची दुरूस्ती झालीच नाही, त्यामुळे पाणी वाया गेले, असा आरोप युवक काँग्रेसचे नरहरी मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
तात्काळ भरपाईची मागणी
माजी जि. प. सदस्य संजय दौंड उभ्या पावसात घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली. अंदाजे ७० एकर जमिन यामुळे बाधित झाल्याचा दावा संजय दौंड यांनी व्यक्त केला आहे. बाजरी, सोयाबीन व कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने बाधित क्षेत्र असलेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलवातीत अशी मागणी त्यांनी केली.