बीड जिल्हा रुग्णालयातील सीझर वार्डमधील व्हिडीओ नातेवाईकांनी केला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:50 PM2020-01-14T15:50:57+5:302020-01-14T16:01:57+5:30

हा प्रकार समजताच परिचारीका आक्रमक झाल्या असून पोलीस कारवाईची मागणी केली आहे

A video from Caesar Ward of Beed District Hospital went viral by a relative of the patient | बीड जिल्हा रुग्णालयातील सीझर वार्डमधील व्हिडीओ नातेवाईकांनी केला व्हायरल

बीड जिल्हा रुग्णालयातील सीझर वार्डमधील व्हिडीओ नातेवाईकांनी केला व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार

बीड : जिल्हा रुग्णालयातील सिझर वॉर्डमधील परिचारीकांच्या कक्षातील व्हिडीओ शुट करून रुग्णाच्या नातेवाईकांनी तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा प्रकार समजताच परिचारीका आक्रमक झाल्या. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

७ जानेवारी रोजी यास्मीन (नाव बदललेले) महिला सिझर होऊन तिस-यांदा प्रसुत झाली. त्यानंतर तिला तिला सीझर वॉर्डमध्ये शरिक करण्यात आले. १३ जानेवारी रोजी तिला सुट्टी देण्यात आली. तिसरे आपत्य असल्याने सदरील रुग्णाला नियमाप्रमाणे १८२० रूपये बील आकारण्यात आले. मात्र, आमची परिस्थिती गरीब असल्याचे सांगत यास्मीनच्या नातेवाईकांनी बील भरण्यास नकार दिला. त्यांनी येथे कर्तव्यास असलेल्या सुप्रिया कोळी व अनिता भावले या परिचारीकांशी हुज्जतही घातली. वॉर्ड प्रमुख मंदा खैरमोडे यांनी हे प्रकरण मिटविले.

या दरम्यानच्या संभाषण हे नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर ते सोशल मिडीयावर व्हायरलही केले. हा प्रकार समजताच भावले, कोळी यांच्यासह सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे धाव घेत रितसर तक्रार केली. संबंधिताने परिचारीकांचा व्हिडीओ व्हायरल केल्याने परिचारीका व रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. संबंधित नातेवाईकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिचारीकांनी केली आहे. यावेळी संगिता दिंडकर, मंदा खैरमोडे, शिला मुंडे, अनिता भावले, सुप्रिया कोळी आदींची उपस्थिती होती. 

दोन आपत्य असल्यास मोफत उपचार
एका महिलेला तीसरे आपत्य असल्यास बेड, शस्त्रक्रिया, तपासणी आदींचे शुल्क आकारले जाते. दोन आपत्य असल्यास ही सुविधा मोफत असते. यास्मीन यांनाही तीन आपत्य असल्यानेच बीलाची आकारणी करण्यात आल्याचे वॉर्ड प्रमुख मंदा खैरमोडे यांनी सांगितले.

.. म्हणून परिचारीका-नातेवाईकांमध्ये वाद
उपचार केल्यानंतर जे काही शुल्क आकारले जाते, ते वसुल करण्यासाठी स्वंतत्र कर्मचारी आहे. मात्र, हे कर्मचारी नेहमीच गायब असतात. त्यामुळे वॉर्डमधील परिचारीकांनाच बील वसुल करावे लागते. वास्तविक पहाता ही जबाबदारी परिचारीकांची नसते. याच बीलावरून मागील काही दिवसांपासून परिचारीका व नातेवाईकांमध्ये वाद होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांना पत्र दिले आहे 
सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाल्याची तक्रार परिचारीकांकडून आली आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले जाईल. रुग्णालयाची काही चुक असेल, तर याचीही चौकशी केली जाईल.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Web Title: A video from Caesar Ward of Beed District Hospital went viral by a relative of the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.