Video : अखेर प्रतिक्षा संपली.... मुंडेंच्या बीडकडे धावली 'झुक झुक झुक झुक आगीनगाडी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 08:29 AM2019-02-26T08:29:03+5:302019-02-26T08:32:47+5:30
विकासाचा बालेकिल्ला माझा बीड जिल्हा असे ट्विट करत पंकजा मुंडेंनी बीडच्या दिशेनं धावलेल्या रेल्वेचा व्हिडीओही शेअर केला आहे.
बीड - दिवंगत भाजपा नेते आणि बीडचे लोकप्रतिनिधी गोपीनाथ मुंडेंचे स्पप्न सत्यात उतरतान्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. कारण, गेल्या 70 वर्षांपासून रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या बीडकरांना प्रथमच रेल्वे इंजिनचा आवाज ऐकू आला आहे. बीड जिल्ह्याच्या कानात प्रथमच झुक झुक आगीनगाडीचा निनादा घुमला आहे. याबाबत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी ट्विट करुन समाधान व्यक्त केलं आहे.
विकासाचा बालेकिल्ला माझा बीड जिल्हा असे ट्विट करत पंकजा मुंडेंनी बीडच्या दिशेनं धावलेल्या रेल्वेचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच गेल्या 70 वर्षांपासून बीडवासियांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत असून याचा अत्यानंद होत असल्याचेही पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बीडच्या सोलापूरवाडीपर्यंत ही रेल्वे धावली आहे. त्यामुळे अखेर बीडकरांची प्रतिक्षा संपली असून लवकरच बीडमधून रेल्वे धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून 2019 पर्यंत नगर-बीड रेल्वे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढील एक वर्षात परळीपर्यंतचे सर्व काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली होती. नगर-बीड-परळी हा मार्ग दीर्घकाळापासून रखडला आहे. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाने गती घेतली असून 2019 पर्यंत नगर-बीड रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे.
नगर-परळी मार्ग बनवण्यासाठी निधीची कमतरता असल्यामुळे हे काम रखडले होते. परंतु आता महाराष्ट्रामध्ये 22 हजार कोटी रूपये खर्च करून नऊ मोठे प्रोजेक्ट रेल्वे विभाग व राज्य सरकार यांच्यावतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नगर-परळी मार्गाचा समावेश करण्यात आला असून हा मार्ग बनवण्यासाठी प्राथमिकता दिली जात आहे. या मार्गातील पहिला टप्पा नगर ते नारायण डोह असून तो पूर्ण झाला आहे. सर्वांत प्रथम बीडपर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करून 2019 पर्यत तो पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पुढील एका वर्षात परळीपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पापूर्वी पालकमंत्री ना. पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती.
पाहा व्हिडीओ -
वा!!! बीड जिल्ह्याच्या कानात झुक झुक ..70 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण ...विकासाचा बाले किल्ला माझा बीड जिल्हा ..सोलापूर वाडी पर्यंत रेल्वे धावली स्वप्न पूर्ती झाली वचन पूर्ती झाली ... pic.twitter.com/JdmJI5InHw
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) February 25, 2019