Video: 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:51 AM2022-08-01T11:51:17+5:302022-08-01T11:53:00+5:30
Vaidyanatha Temple: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
- संजय खाकरे
परळी (बीड): हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करत हजारो शिवभक्तानी श्री प्रभुवैद्यनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त मनोभावे दर्शन घेतले. महिलांनी तांदूळ शिवामूठ वाहून व बिल्वपत्र वैद्यनाथास अर्पण करून दर्शन घेतले. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी (Vaidyanatha Temple) मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी या गर्दीत वाढ झाली.
हजारो भाविकांचे दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले. या बॅरिकेट्स मधून भाविकांनी मंदिरात पूर्वेच्या दरवाजाने जाऊन दर्शन घेतले मंदिरामध्ये वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता. पहिला श्रावणसमोर असल्याने राज्य व परराज्यातून शिवभक्त परळीत दर्शनासाठी आले. वैद्यनाथ मंदिरात रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती. सकाळी आठ वाजेच्यानंतर या गर्दीत वाढ झाली.
'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन #ShrawanMaas#ParaliVaidyanathapic.twitter.com/POQ3j39OUA
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 1, 2022
पोलीस प्रशासनच्या वतीने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हजारो भक्तांनी शिस्तीत उभे राहून वैजनाथाचे दर्शन घेतले. प्रसाद साहित्य, पेढे विक्रेते, बिल्वपत्र घेण्यासाठी या ठिकाणीही भाविकांची गर्दी झाली. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांच्या संख्येने फुलून गेला आहे. वैद्यनाथ मंदिरात महिला, पुरुष व पास धारकांची स्वतंत्र रांग लावण्यात आली आशी माहिती श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. रविवारी रात्री शिव कावड पदयात्रा लातूरहून परळीस आली. हरहर महादेवचा जयघोष करत पदयात्रेतील भाविकांनी वैद्यनाथ मंदिराच्यासमोर आनंदत व्यक्त केला.
गंगेचे पाणी आणण्याची परंपरा
श्रावण महिनाभर वाणी संगम येथून गंगेचे पाणी प्रभू वैद्यनाथास कावडद्वारे आणून प्रभू वैद्यनाथास वाहण्याची नाथरा येथील मुंडे, सोनपेठ येथील महाजन कुटुंबांची पिढ्यान पिढ्याची परंपरा आज ही कायम आहे. नाथरा येथील मुंडे कुटुंबातील धनंजय पंडितराव मुंडे यांच्या कावडीतून गंगेचे पाणी नरहरी मुंडलिक, गोरख गित्ते तर सोनपेठ येथील शिवाजीअप्पा महाजन यांच्या कुटुंबातील शैलेश शिवाजी महाजन यांची कावड सदाशिव व्यंकटी चांगिरे श्रावणात वैद्यनाथ मंदिरात आणतात व कावडीतील गंगेचे पाणी श्री वैद्यनाथाला वाहतात. तसेच परळी तालुक्यातील खेड्यातून अनेक भाविक गंगेचे पाणी श्री वैद्यनाथाला वाहतात.