Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 04:03 PM2022-06-12T16:03:42+5:302022-06-12T16:05:05+5:30

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत

Video: Praveen runs in front of Darekar's car, Pankaja Munde supporters attack in Beed | Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी

Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी

googlenewsNext

बीड : पंकजा मुंडेंचं नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होतं. मात्र, प्रत्यक्षात त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे, मुंडे समर्थकांसह पंकजा मुंडे याही नाराज असल्याचं समजतं आहे. कारण, भाजपकडून विधानपरिषदेची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. एका कार्यकर्त्याने किटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. आता, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडविण्याचं काम मुंडे समर्थकांनी केलं. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील धांडे नगर परिसरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी, ड्रायव्हरने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असताना काही कार्यकर्ते रस्त्यावर पडले. पोलिसांनीही मुंडे समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

प्रवीण दरेकर हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुढे निघत असताना पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गाडी न रोखल्यानं पंकजा समर्थकांनी थेट गाड्यांसमोर धाव घेतली. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. भाजपकडून मुंडे बाहिणींवर अन्याय होतोय. यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर, आता पंकजा मुंडेंचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार हे याकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडेंचं अद्यापही मौन

भाजपकडून विधानपरिषदेची यादी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. मात्र, यावर पंकजा यांनी काहीही विधान केलं नाही. तसेच, पंकजा मुंडेंनी अद्यापही याप्रकरणी मौन सोडलं नाही. त्यातच, राज्यसभा निवडणुकीत भाजपने लक्षवेधी विजय मिळवला. संख्याबळ कमी असतानाही भाजपचा तिसरा खासदार निवडून आला. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेल्या पंकजा यांनी या विजयाबद्दल ना उमेदवारांचे अभिनंदन केल्याचे दिसून आले, ना भाजपचे.  
 

Web Title: Video: Praveen runs in front of Darekar's car, Pankaja Munde supporters attack in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.