Video: देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळवली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:17 PM2023-12-28T17:17:43+5:302023-12-28T17:17:58+5:30

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील घटना

Video: Shocking! Thieves stole the donation box from the famous Purushottama temple | Video: देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळवली

Video: देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळवली

माजलगाव: भारतातील एकमेव असलेले माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या मंदिरातून मंगळवारी रात्री चोरट्यांनी दानपेटी पळवली. याबाबत बुधवारी रात्री मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांना खबर लागली. त्यानंतर पोलिसांनी दानपेटी शोधून काढली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतात केवळ पुरूषोत्तमाचे एकच पुरातन मंदिर असून ते मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. या ठिकाणी अधिक मास महिन्यात संपूर्ण देशातून या ठिकाणी भाविक येतात. सध्या या ठिकाणी मंदिराच्या जिर्णोदराचे काम सुरू आहे. यामुळे पुरुषोत्तमाची मूर्ती स्थलांतरित करून बाजूला एका शेडमध्ये ठेवण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी दत्तात्रय निवासराव कोळेकर व संस्थेचे अध्यक्ष विजय गोळेकर हे मंगळवारी रात्री दहा वाजता मंदिरास कुलूप लावून गेले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी ११ ते बारा १२ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी उचलून नेली. मंदिराच्या शेजारील गोदावरी पात्रात नेऊन चोरट्यांनी दानपेटीचे एक कुलूप तोडले, मात्र दुसरे कुलूप तुटलेच नाही. त्यामुळे चोरट्यांनी एका नाल्यात दानपेटी फेकून दिली.

दुसऱ्या दिवशी रात्री आले निदर्शनास
बुधवारी दिवसभर भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन गेले. पण कोणालाही दानपेटी नसल्याचे लक्षात आले नाही. दरम्यान, रात्री ६ वाजता विजय गोळेकर व त्यांचे सहकारी हरिपाठ घेण्यासाठी मंदिरात आले. यावेळी दानपेटी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी मंदिरात येऊन पाहणी केली. पोलिसांनी शोध घेतला असता दानपेटी नाल्यात आढळून आली. त्यानंतर दानपेटी ताब्यात घेऊन पोलिसांनी परत ती मंदिरात आणून ठेवली. याबाबत विजय गोळेकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जोनवाल हे करत आहेत.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ
आठ दिवसांपूर्वी पुरुषोत्तमपुरी येथे एकाच रात्री तीन घरफोडी झाल्या. तर दुसऱ्या दिवशी चोरीचा असफल प्रयत्न झाला होता. आता मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली. चोरीच्या वाढत्या घटनांनी गावात दहशतीचे वातावरण असून गावकऱ्यांमध्ये पोलिसांविरोधात रोष निर्माण झाला आहे.

Web Title: Video: Shocking! Thieves stole the donation box from the famous Purushottama temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.