Video: जमिनीतून निघाला धूर आणि लाव्हासदृश उकळता खडक, बीडमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 07:26 PM2019-04-13T19:26:07+5:302019-04-13T19:30:44+5:30
मोकळ्या मैदानात जमिनीतून अचानक धूर आणि लाव्हा बाहेर आल्याने खळबळ
- गणेश देशमुख
सिरसाळा (बीड ) : सिरसाळा-मोहा रस्त्यावर असणाऱ्या मोकळ्या मैदानात जमिनीतून अचानक धूर आणि लाव्हा सदृश्य उकळता खडक बाहेर येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता समोर आला. आज दिवसभर हा भाग शांत होता. मात्र या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी दिसून आली.
सिरसाळा येथे मोहा रस्त्यावर नवीन वस्ती तयार झाली आहे. या वस्तीसमोर एक मोकळे मैदान आहे. मैदानातून उच्चदाब विद्युत वाहिनी गेली आहे. यातील एका खांबाजवळील जागेतून शुक्रवारी सायंकाळी धूर आणि उकळत्या खडकाच्या बुडबुड्या फुटत असल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले. काही वेळातच जमिनीतून लाव्हा निघत असल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आणि येथे बघ्यांची गर्दी वाढली. याची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या भागात नव्याने वस्तीस आलेल्या नागरिकांनाया प्रकारामुळे घाम फुटला आहे. हे कशामुळे घडले हे कोड मात्र अद्याप अनुत्तरीत आहे.
वीज प्रवाह बंद करताच शांतता
या प्रकाराची माहिती वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळीवरील उच्चदाब विद्युत वाहिनीचा विद्युत प्रवाh बंद करताच या ज्वाला बंद झाल्या. याबाबतच्या माहितीसाठी येथील महावितरण चे कनिष्ठ अभियंता नामदेव सुतार यांच्याशी संपर्क व्होऊ शकला नाही.
लाव्हाचा प्रकार नाही
याबाबत येथील तलाठी युवराज सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्रकार लाव्हाचा नसल्याचे सांगितले. प्राथमिक माहितीनुसार विजेच्या खांबातून विज प्रवाह उतरल्या मुळे हा प्रकार झाला असावा असा दावा त्यांनी केला असून आम्ही याबाबत सतर्क असल्याचे ते म्हणाले.
पहा व्हिडिओ :