Video: पुलावरून पाणी वाहतंय अन् पठ्याने बाईक घातली, जीवावर बेतले होते पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 03:11 PM2022-10-12T15:11:23+5:302022-10-12T15:12:17+5:30
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढेनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते.
गेवराई (बीड) : परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने पांढरवाडी जवळील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. एकाने त्यात दुचाकी नेली. मात्र, प्रवाह जास्त असल्याने तो गाडीसह वाहून गेला. कसेबसे काठावर आलेल्या या व्यक्तिला नंतर नागरिकांनी बाहेर काढले.
उमर वजिर सय्यद ( ४५, हिरडपुरी, पैठण, हल्ली मुक्काम चिकलठाणा औरंगाबाद ) असे थोडक्यात बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमर मंगळवारी औरंगाबादहून तालुक्यातील खळेगावं येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढेनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. शहराजवळ असलेल्या पांढरवाडी ओढ्याला या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पाणी पुलावरून वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
बीड: अतिधाडस आले अंगलट, पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी नेली, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, गेवराई तालुक्यातील घटना.#beedpic.twitter.com/fTxDTU7HnK
— Lokmat (@lokmat) October 12, 2022
कसाबसा गाठला काठ
पुलाच्या अलीकडेच नागरिक थांबलेले दिसत असताना उमर यांनी अतिधाडस करत पुरातून गाडी घातली. मात्र, प्रवाहाचा वेग जास्त असल्याने गाडीसह उमर वाहून गेले. कसेबसे काठ गाठल्यानंतर नागरीकांनी त्यांना बाहेर काढले. तो वाचला पण दुचाकी पाण्यात वाहून केली असून अद्याप शोध लागला नाही. नागरिकांनी वाहत्या पाण्यातून दुचाकी किंवा पाण्यात जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.