Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 12:00 PM2022-02-14T12:00:33+5:302022-02-14T12:00:52+5:30
केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळ जवळ गाडीने पेट घेतला
केज ( बीड ) : एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळजवळ घडली. प्रसंगावधान राखत वेळीच गाडी उभी केल्याने कारमधील सीएसह पाचजणांचे प्राण वाचले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, लातूर येथील सीए गणेश महापुरकर हे आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास लातूर येथून कारने (एमएच-४८/एस-२८५२) बीडकडे जात होते. कारमध्ये सीए महापूरकर यांच्यासह पाचजण होते. सकाळी साडेनऊच्या दरम्यान, कुंबेफळजवळ येताच कारच्या समोरच्या बाजूने धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यामुळे चालकाने लागलीच कार रस्त्याच्या बाजूला घेत उभी केली.
'बर्निंग कार'; सीएसह पाचजणांचे प्रसंगावधानाने वाचले प्राण; केज-अंबाजोगाई रस्त्यावर कुंबेफळजवळील घटना pic.twitter.com/qi2PyiFwvf
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) February 14, 2022
प्रसंगावधान राखत सर्वजण लागलीच कारमधून बाहेर पडले. त्याचक्षणी कारने पेट घेतला. क्षणार्धात कारला आगीने कवेत घेतले. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहानी टळली. सदर घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली आहे.