' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:40 PM2018-08-13T14:40:13+5:302018-08-13T14:42:00+5:30
पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे.
परळी (बीड ) : पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. दुपारी १ पर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी वैदनाथाचे दर्शन घेतले आहे.
'हर हर महादेव' चा जयघोष करीत भाविकांची रविवारी रात्रीपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात रीघ लागली होती. दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरातआदी राज्यातील भाविक येथे दाखल झाले आहेत.
दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावून महिलांसाठी वेगळ्या रांगांची खास सोय करण्यात आली आहे. सकाळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार आर.टी. देशमुख यांनी तर दुपारी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
यासोबतच येथे वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट, लिंगायत समाज व भाविकांच्यावतीने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळासुद्धा सुरु आहे. यासाठीही भाविकांचे मोठ्या प्रमाणावर शहरात आगमन होत आहे. अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी श्रावण महिना सुरु होत असल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
मंदिर परिसरात २०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक डि.के.शेळके,उमाशंकर कस्तुरे व देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांची उपस्थिती होती.