ग्रामप्रमुख व्यक्ती हे प्रेरणादायी पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:37+5:302021-02-13T04:32:37+5:30
घाटनांदूर : ग्रामप्रमुख, सरपंचपदावर कार्य करणारे व्यक्ती हे प्रेरणादायी आहेत. कारण, त्यांच्यावरच संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी असून ...
घाटनांदूर : ग्रामप्रमुख, सरपंचपदावर कार्य करणारे व्यक्ती हे प्रेरणादायी आहेत. कारण, त्यांच्यावरच संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी असून अशा गणमान्य व्यक्तींचा सत्कार करून आम्हालाही ऊर्जा प्राप्त होईल, असे प्रतिपादन येथील एस. बी. आय. बँकेचे शाखा व्यवस्थापक डॉ. शरदकुमार वर्मा यांनी केले.
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने व्यवस्थापक डॉ. शरदकुमार वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सरपंच दिनाचे आयोजन केले होते. यावेळी घाटनांदूरसह परिसरातील नागदरा,लाडझरी, मैंदवाडी, चंदनवाडी, तळणी,लेंडेवाडी येथील सरपंचांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळणीचे सरपंच बापूसाहेब गित्ते हे होते. वर्मा म्हणाले, सरपंच हे गावाच्या विकासासाठी सतत संघर्ष करीत असतात. ते गावातील प्रत्येक नागरिकांसाठी आशेचा किरण असतात. सुख-दु:खात ते सावलीसारखे पाठीशी असतात. त्याचप्रमाणे ते आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी मदत करतात. अशा व्यक्तींकडून प्रेरणा घेण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात शिवाजी घुले, रमाकांत घुले, शिरीष नाकाडे, महादेव होळंबे, ज्ञानोबा जाधव, बापूसाहेब गित्ते, रामभाऊ गित्ते, सुनिता चव्हाण आदी सरपंचांचा सत्कार करण्यात आला. शाखा स्थापनेपासून पहिल्यांदाच किसान दिन, सरपंच दिन अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने घाटनांदूरसह परिसरातील गावच्या सरपंचांनी बँकेच्या उपक्रमाची प्रशंसा केली. प्रास्ताविक उपव्यवस्थापक राकेश सिंग यांनी केले. मंदार देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी राकेश सिंग, मंदार देशपांडे, सचिन हिवरेकर,अरुण चव्हाण, संतोष डहाळे संतोष शहाणे आदींनी परिश्रम घेतले.