तीन दिवसांपासून गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ञाला कोंडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 05:38 PM2023-04-15T17:38:51+5:302023-04-15T17:39:44+5:30
अवाकाळी पावसामुळे केजसह ग्रामीण भागातील वीज बंद आहे
- मधुकर सिरसट
केज (बीड): तालुक्यातील तांबवा गावातील वीज तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. विद्युत मोटारी, गिरणी बंद असल्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. मागणी करूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने आज सकाळी ग्रामस्थांनी शाखा अभियंता साळकराम अंडील व तंत्रज्ञ सतीश तांदळे यांना महावितरणच्या कार्यालयात कोंडले.
अवाकाळी पावसामुळे केजसह ग्रामीण भागातील वीज बंद असल्याने शाखा अभियंता साळीकराम अंडील हे तंत्रज्ञ सतीश तांदळे, लाईनमन मसुरे, गवळी, ढाकणे यांच्यासह सुटी असतानाही कार्यालयात काम करत होते. दरम्यान, आज सकाळी मीरा आंधळे, संगीता ओव्हाळ, कैकई ओव्हाळ, संजीवनी चाटे, बारीकबाई चाटे, कविता ओव्हाळ, अनिता ओव्हाळ, ताईबाई पवार, प्रयागाबाई पवार, मीरा ओव्हाळ, मंगल लांडगे, लंकाबाई चाटे, रुक्मिणी परळकर आदी महिलांसह रामधन चाटे, अरुण चाटे, ज्ञानेश्वर कराड, विनोद चाटे, गणेश कांदे, गोविंद नागरगोजे, विष्णू चाटे, शिवकुमार चाटे, सचिन चाटे, गणेश चाटे यांनी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करत शाखा अभियंता साळीकराम अंडील व तंत्रज्ञ सतीश तांदळे यांना ग्रामस्थांनी कार्यालयात कोंडले.
दरम्यान, अभियंता अंडील यांनी उपकार्यकारी अभियंता नामदेव सुतार यांच्या कानावर हा प्रकार घातला. यावेळी संतप्त महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी पीठ नाही. सांगा आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न यावेळी महिला आंदोलकांनी उपस्थितीत केला. एक तासानंतर आंदोलकांनी दरवाजा उघडून चर्चा केली. लवकरच गावातील वीज पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वीज पडल्यामुळे तांत्रिक अडचण
याप्रकरणी शाखा अभियंता साळीकराम अंडील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी केज येथील महावितरणच्या रोहित्रावर वीज पडल्यामुळे विजपुरवठा पूर्णतःह खंडित झाला होता. शुक्रवारी सुट्टी असतानाही 8 रिले आणि शिट्टी उपलब्ध करून जोडण्यात आले होते. परंतु तरीही वीज सुरुळीत झाली नव्हती. आंदोलन केल्यामुळे वरिष्ठाच्या परवानगीने सध्या बायपास करून थेट जोडणी करून वीज पुरवठा सुरुळीत करण्यात आल आहे.