पिता-पुत्रांवरील हद्दपारीविरोधात एकवटले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:05+5:302021-08-27T04:37:05+5:30

बीड : आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी २५ ऑगस्ट रोजी २२ आरोपींवर हद्दपारीची कारवाई केली होती. भवानवाडी ...

A village united against the deportation of fathers and sons | पिता-पुत्रांवरील हद्दपारीविरोधात एकवटले गाव

पिता-पुत्रांवरील हद्दपारीविरोधात एकवटले गाव

Next

बीड : आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी २५ ऑगस्ट रोजी २२ आरोपींवर हद्दपारीची कारवाई केली होती. भवानवाडी (ता.बीड) येथील पिता-पुत्रांचा यात समावेश आहे. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी पिंपळनेर पोलीस त्यांना ताब्यात घेण्यास गेले तेव्हा गावकऱ्यांनी कारवाईला विरोध करत पोलिसांची जीप अडीच तास रोखून धरली.

हरिदास मनोहर जगताप, प्रताप हरिदास जगताप व अमोल हरिदास जगताप (रा. भवानवाडी) अशी त्या पिता-पुत्रांची नावे आहेत. पिंपळनेर पोलिसांनी त्यांच्याविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता, तो पोलीस अधीक्षकांनी सुनावणी घेऊन मंजूर केला. या तिघांना बीड व वडवणी तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. दरम्यान, अशा कारवाईनंतर संबंधितांना ताब्यात घेऊन हद्दीबाहेर सोडावे लागते. यासाठी पिंपळनेर ठाण्याचे उपनिरीक्षक बाबासाहेब खरात व सहकारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी भवानवाडीत पोहोचले. हरिदास जगताप हे शेतकरी असून प्रताप व अमोल ही त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांचे हरिदास हे बंधू आहेत. राजकीय सूडबुध्दीने ही कारवाई केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यावेळी गावातील महिला, पुरुषांनी जीपला वेढा टाकत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी गाडी हलू देणार नाहीत, असा पवित्रा घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. अडीच तासांनंतर गावकऱ्यांनी नमती भूमिका घेतल्याने पोलीस तिघांना घेऊन निघून गेले.

...

दोन दिवसांवर परीक्षा, भवितव्य धोक्यात

हरिदास जगताप हे दहा एकर शेतीचे मालक आहेत. प्रताप व अमोल ही त्यांची दोन्ही मुले शिक्षण घेतात. प्रताप पदवीच्या प्रथम वर्षात आहे. अमोल याची दोन दिवसांवर स्थापत्य अभियांत्रिकीची परीक्षा आहे. त्यापूर्वीच पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केल्याने शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचे हनुमंत जगताप यांनी सांगितले.

...

मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. ही कारवाई सूडबुध्दीने झाली, पण जिल्हाप्रमुख पाठीमागे उभे राहिले नाहीत. शिवसेनेसाठी आयुष्य घातले आहे, आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच आम्हाला न्याय द्यावा.

- हनुमंत जगताप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

...

त्या तिघांवर बीडमध्ये शिवाजीनगर ठाण्यातही गुन्हे नोंद आहेत. कारवाई अन्यायकारक नाही. आरोपांत तथ्य नाही. त्या तिघांना घेऊन येताना गावकरी जीपसमोर आले होते. मात्र, नंतर ते शांत झाले व पोलिसांनी कारवाई पूर्ण केली.

- शरद भुतेकर, सहायक निरीक्षक, पिंपळनेर ठाणे

....

नोटीस दोन गुन्ह्यांची पोलीस म्हणतात चार गुन्हे

हद्दपारीच्या नोटीसमध्ये पिंपळनेर ठाण्यात दाखल ३०७ व ३२४ या दोन गुन्ह्यांचा उल्लेख आहे. दोन गुन्ह्यांवर हद्दपारीची कारवाई कशी, असा सवाल गावकऱ्यांनी केला. पोलिसांनी मात्र त्यांच्यावर चार गुन्हे नोंद असून यातील दोन शिवाजीनगर ठाण्यात नोंद असल्याचा दावा केला.

....

चोर सोडून संन्याशाला फाशी

जिल्ह्यात अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. मटका, जुगार, दारूमुळे कित्येक संसार उद्ध्वस्थ झाले आहेत.

मात्र, त्यांना मोकळे रान सोडून सामान्य शेतकरी व विद्यार्थ्यांवर हद्दपारीच्या कारवाया करण्याची मर्दुमकी दाखवून पोलीस काय हासील करू इच्छितात, असा रोकडा सवाल महिला, पुरुषांनी केला. चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचा हा प्रकार आहे, ही कारवाई अन्यायकारक आहे, असे म्हणत काही महिलांनी जीपसमोर झोपण्याचाही प्रयत्न केला.

....

Web Title: A village united against the deportation of fathers and sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.