आरणवाडी साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:26+5:302021-04-26T04:30:26+5:30

धारूर : तालूक्यातील आरणवाडी साठवाण तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून, धार कोंडण्याचे महत्त्वाचे काम सुरू असताना मुरुमाऐवजी मोठ्या दगडाचा ...

The villagers stopped the work of Aranwadi storage pond | आरणवाडी साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

आरणवाडी साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

googlenewsNext

धारूर : तालूक्यातील आरणवाडी साठवाण तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून, धार कोंडण्याचे महत्त्वाचे काम सुरू असताना मुरुमाऐवजी मोठ्या दगडाचा भराव टाकून निकृष्ट दर्जाचे काम उरकले जात आहे. त्यामुळे भविष्यात तलावास धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने अरणवाडी येथील सजग ग्रामस्थांनी तलावावर जाऊन हे काम बंद करायला लावले.

अरणवाडी येथील साठवण तलावाचे रखडलेले काम आमदार प्रकाश सोंळके यांच्या पाठपुराव्यामुळे आता वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या तलावामुळे डोंगराळ भागातील सहा ते सात गावांना फायदा होणार असून, या तलावाची धार कोंडण्याचे काम सध्या सुरू आहे. लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी व गुत्तेदार मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे करून आटोपण्याचा प्रयत्न करत आहेत. मुरूम व काळीमाती वापरून धार कोंडणे आवश्यक आहे. काळी मातीचा वापर चांगला करण्यात आला. मात्र या भिंतीला मजबुती येण्यासाठी मातीच्या थराच्या दोन्ही बाजूला बारीक मुरूम वापरणे व दबाई करणे आवश्यक आहे. मात्र गुत्तेदार व अधिकारी संगनमताने धार कोंडण्याचे काम करताना चक्क मोठी दगडे टाकून हे काम आटोपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले तर पुढे या तलावाखालील गावांना धोका होऊ शकतो यामुळे अरणवाडी येथील ग्रामस्थ बंडू काळे, बजरंग माने, सरपंच लहू फुटाने इतरांनी आमदार प्रकाश सोंळके यांना ही बाब लक्षात आणूण दिली. त्यानंतर भरलेली दगडे काढून संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामात सुधारणा करावी असे म्हणत, हे काम बंद करायला लावले. दुपारपर्यंत हे अधिकारी या कामाकडे फिरकले नव्हते.

तक्रार खपवून घेणार नाही

अरणवाडी साठवण तलाव हा डोंगराळ भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. हे रखडलेले काम आपण प्रयत्नपूर्वक चालू केले आहे. हे काम अधिकाऱ्यांनी चांगल्या दर्जाचे करावे. कुठलीही तक्रार खपवून घेतली जाणार नाही. तलावाच्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रकाश सोळंके यांनी केल्या.

काम चांगल्या दर्जाचे करून घेऊ

अरणवाडी साठवण तलावाच्या कामाबद्दल आमदार प्रकाश सोंळके यांनी सूचना केल्या असून, ठेकेदाराने दगडाचा भराव केला असेल तर ती दगडे काढून टाकून मुरूम वापरला जाईल व काम चांगल्या दर्जाचे करून घेतले जाईल. चौव्हान, उपअभियंता, लघु पाटबंधारे.

Web Title: The villagers stopped the work of Aranwadi storage pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.