विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त; हलगी मोर्चा काढून महावितरण कार्यालयास घातला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:10 PM2024-05-31T17:10:32+5:302024-05-31T17:10:53+5:30
लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी देत आंदोलनास स्थगिती दिली.
दिंद्रुड ( बीड): गेल्या काही दिवसांपासून दिंद्रुड येथे विजेचा लपंडाव नियमित झाला आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी आज सकाळी येथील हलगी मोर्चा काढत महावितरण कार्यालयाला घेराव घातला. आक्रमक ग्रामस्थांनी यावेळी महावितरण अभियंत्यास बेशरमाच्या पानांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांनी माघार घेतली.
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून दिंद्रुडची नोंद आहे. मागील आठ दिवसांपासून गावात विजेचा सतत लपंडाव होत आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून त्यात वीज नसल्याने गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी मागणीकरूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने आज सकाळी दिंद्रुड ग्रामस्थांनी हलगी मोर्चा काढत महावितरण कार्यालयाला घेराव घातला. अभियंता उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यास संपूर्ण वीज पुरवठा बंद पाडण्यास भाग पाडले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत वीज पुरवठा सुरू न करण्याचा पवित्रा दिंद्रुडकरांनी घेतला.
दरम्यान, तब्बल दोन तासानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता योगेश बोरखडे यांनी कार्यालयात येत ग्रामस्थांची बाजू समजून घेतली. यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यास बेशरमीच्या पानांचा हार घालत निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी देत आंदोलनास स्थगिती दिली.