गावठाणांचे ड्रोनद्वारे केले जाणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:34 AM2019-07-10T00:34:30+5:302019-07-10T00:35:17+5:30
ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे गावठाणातील मालमत्तांचे सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंबलबजावणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे गावठाणातील मालमत्तांचे सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंबलबजावणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जमाबंदी आयुक्त चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यासह इतर अधिकारी उपस्थित होते, यामध्ये सर्व गावठाणांचे भूमापन सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासन आणि सर्वे आॅफ इंडियाच्या वतीने मराठवाड्यातील गावठाणांचे ड्रोनद्वारे भुमापण करण्यात येणार असून आत्तापर्यंत झालेल्या सर्वे पैकी सर्वात मोठी असणारी ही मोहीम कमी वेळात अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे पूर्ण करण्यात येणार आहे.
गावठाणातील व लगतच्या मालमत्तांचे सीमा निश्चितीकरण करणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश असून याद्वारे सर्वे नंबर निश्चित केले जातील. या मोहिमेसाठी गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना याची माहिती दिली जाणार असून मिळकतीच्या सीमारेषा जुन्याद्वारे निश्चित केल्या जातील. चुन्या द्वारे मार्किंग केलेल्या या सीमारेषांचे नंतर ड्रोन द्वारे रेकॉर्ड तयार केले जाणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरातून ही मोहीम जलद गतीने पूर्ण होणार आहे. यावेळी बोलताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, जुन्या गावठाणांचे क्षेत्र मर्यादित होते, त्या मध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मालमत्तेचे गावठाण विस्तारीकरण कार्यक्रमाद्वारे होत आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्याद्वारे गावठाण मधील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून गावातील रहिवाशांसाठी महत्त्वाचा आहे. याचा उपयोग पुढील काळात त्यांना मालमत्तांच्या संदभार्तील व्यवहारांसाठी होऊ शकतो.
या दृष्टीने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि केज येथे ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे गावठाणांच्या मालमत्तांच्या सर्वे ची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भोकरे, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, भूमी अभिलेखचे अधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, महसूल ग्रामविकास विभागातील तालुका स्तरावरील यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.