“आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाहावे”: विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 10:51 PM2021-10-30T22:51:30+5:302021-10-30T22:52:07+5:30
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
बीड:मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) जामिनावर सुटका करण्यात आली. शनिवारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खानला आर्थर रोड कारागृहातून सोडण्यात आले. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेते एनसीबी आणि भाजपवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळाले. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाहावे, असा टोला लगावला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात १५९ आत्महत्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही बाब लाजिरवाणी आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली, अशी विचारणा करत मेटे यांनी दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.
उद्धवा… अजब तुझे सरकार
‘उद्धवा… अजब तुझे सरकार’ असे म्हणत विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्षाचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विनायक मेटे आपली भूमिका आणि निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. मेटे यांनी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शिवसंग्रामच्या या मेळाव्यात आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, कोरोना नियम शिथिल होताच राज्यभरात वेगवेगळ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सहकारी संस्था, जिल्हा बँका, पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. तसेच येत्या काळात राज्यातील प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकाही होणार असून, यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पुणे महानगरपालिकेची रंगली आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.