विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By संजय तिपाले | Published: August 15, 2022 06:22 PM2022-08-15T18:22:39+5:302022-08-15T18:23:50+5:30
शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी कायम संघर्षाची भूमिका घेतली. मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीला येताना त्यांचे अपघाती निधन झाले. हा मनाला वेदना देणारा प्रसंग आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली. विनायक मेटे यांनी ज्या प्रश्नांवर लढा दिला त्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी इतरमान्यवरांनीही शोकभावना व्यक्त केल्या.
शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिला कुटुंबाला धीर -
यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शोकाकुल मेटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्या दोघांनी मेटे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. मेटे यांच्या निधनाने कोलमडून पडलेल्या पत्नी ज्योती, आई लोचनाबाई, मुलगा आशितोष, मुलगी आकांक्षा ,बंधू रामहरी मेटे यांचे सांत्वन केले. यावेळी शिंदे, फडणवीस यांनाही गहिवरून आले.