कोरोना नियमांचा भंग, दहा हॉटेल चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:42+5:302021-08-02T04:12:42+5:30
माजलगाव : कोरोनाची शासन नियमावली मोडून हॉटेल व्यवसाय करणाऱ्या दहा हॉटेल चालकांवर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास महसूल व ...
माजलगाव : कोरोनाची शासन नियमावली मोडून हॉटेल व्यवसाय करणाऱ्या दहा हॉटेल चालकांवर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास महसूल व नगरपरिषदेच्या पथकामार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांनी शहरातील दोन व ग्रामीण भागातील ८ अशा एकूण दहा हॉटेल चालकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड केला.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी नियमावली तयार केलेली आहे. त्यानुषंगाने हॉटेल व्यावसायिकांसाठी फक्त पार्सल सुविधेसाठी परवानगी देण्यात आली आहे, तरीही शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक राजरोस उघडे ठेवतात. अशा हॉटेल चालकांविरुद्ध पथकाने संयुक्तिक मोहीम राबवली. या दरम्यान ग्रामीण भागात पात्रुड येथे आठ हॉटेल चालकांवर तहसीलदार वैशाली पाटील यांनी दंडात्मक कारवाई करून, प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार साबणे, तलाठी रामकिसन इंगळे, केरबा तपसे, शिवहर शेटे, भुजंगा गायकवाड इत्यादी कर्मचारी सहभागी झाले होते.