कोरोना नियमांचे उल्लंघन; एक कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:14+5:302021-06-23T04:22:14+5:30
बीड : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. मार्च ...
बीड : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. मार्च ते मेअखेरपर्यंत जवळपास ५० हजार कारवाया वाहतूक शाखेकडून करण्यात आल्या असून, जवळपास एक कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमुळे कोरोना संसर्ग थांबविण्यासदेखील प्रशासनास काही प्रमाणात यश आले आहे. यामध्ये नगरपालिकेसोबत मिळून विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली होती.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. जिल्ह्यातील रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक होती. अनेक निर्बंध घालण्यात आले होते. विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अनेकजण विनाकारण गाडी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. यावेळी केलेल्या कारवायांमुळे आवश्यक नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या निश्चित कमी झाली होती. मात्र, दुचाकीस्वारांना पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्यामुळे अनेक ठिकाणावरून तीव्र संतापदेखील पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध पाहायला मिळाला होता.
या अडीच महिन्यात ट्रिपल सिट, विनामास्क, नो पार्किंग, विनापरवाना यासह विविध कारणास्तव जवळपास ५० हजार केसेस करण्यात आल्या. यावेळी नियम मोडणाऱ्यांकडून एक कोटी पाच लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अजूनदेखील कारवाया सुरूच असून, किमान दुचाकीस्वारांची परिस्थिती पाहून किंवा सर्वांगीण विचार करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अनेकवेळा फक्त ग्रामीण भागातील वाहनचालकांवर कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
मोबाइलवर बोलणे - १३००
ट्रिपल सिट ११००
विनाहेल्मेट १२००
नो पार्किंग १७००
नंबर प्लेटसंदर्भात कारवाई ९००
विनापरवाना वाहन चालवणे ९००
नो पार्किंग, मोबाइल बोलणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया
एप्रिल व मे महिन्यात नो पार्किंमध्ये वाहन उभे करणे व मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील दंडात्मक कारवाई केल्यामुळे अनेकजण मास्क वापरू लागले आहेत.
मोटार वाहन कायद्यानुसार केसेस
मोटार वाहन कायद्यानुसार सर्वाधिक ५० हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व माध्यमातून जवळपास एक कोटी पाच लक्ष रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. या कारवायांमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे पोलीस प्रशासनाचे मत आहे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यामुळे अपघात टाळता येतात. त्यामुळे सर्व नियमांचे पालन व्हावे, यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात आल्या. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील कारवाई केल्यामुळे अनेकजण मास्क वापरत आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यात मदत होत आहे.
कैलास भारती, वाहतूक शाखाप्रमुख, बीड
===Photopath===
220621\22_2_bed_2_22062021_14.jpg
===Caption===
वाहतूक शाखा