वाहन निरीक्षकपदी रुजू होण्याआधीच परवान्यात खाडाखोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:02 PM2020-07-17T20:02:11+5:302020-07-17T20:03:59+5:30
बीड जिल्ह्यातील परिवहन कार्यालयातील गलथानपणा चव्हाट्यावर
बीड : शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ येथील अनघा नंदकिशोर थोरात हिने सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी रुजू होण्याआधीच आरटीओ कार्यालयातील एका लिपिकासह अन्य मुलीच्या साथीने वाहन परवान्यात खाडाखोड केली. हा सर्व प्रकार आयुक्त कार्यालयातील कागदपत्र पडताळणीतून उघड झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनघा नंदकिशोर थोरात हिची एमपीएसीअंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून निवड झाली होती. रुजू होण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्यासह त्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. अनघाकडे अहमदनगर येथील वाहन परवाना होता; परंतु त्याचा कालावधी वैध होत नव्हता. त्यामुळे तिने बीडमधील आदर्शनगर येथील रेवती अजय जोगदंड हिच्या नावाच्या परवान्यात सर्वच बदल केले. एआरटीओ कार्यालयातील सतीश इंगोले या लिपिकाच्या मदतीने छाननी व मंजूरही करून घेतले. त्यानंतर भरती होण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले. येथील संगणकात तपासणी करताच दोन वाहन परवाने दिसले.
त्यानंतर आयुक्त कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून खुलासा करण्यास सांगितले. याबाबत चौकशी केली असता यात घोळ असल्याचे उघड झाले. प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवाड यांनी याबाबबत या तिघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे अनघा थोरात, रेवती जोगदंड व आरटीओ कार्यालयाचाच लिपिक सतीष इंगळे याच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सुजित बडे करीत आहेत.
वाहन परवान्यात खाडाखोड करण्यासह संगणक प्रणालीतही बदल केल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले. त्यामुळे एका लिपिकासह घोळ करणाऱ्या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे.
- संजय मैत्रेवाड, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड
एजंटच्या मदतीने केला घोळ?
या प्रकरणात खाजगी एजंटही सहभागी असण्याची शक्यता आहे. बीडच्या कार्यालयात सर्रासपणे एजंट वावरत असतात. त्यामुळे या प्रकरणात अप्रत्यक्ष एजंटचा हात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.